नाना-नानी पार्क नशेबाज तरुणांचा अड्डा

मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील अवसरी बुद्रुक येथील नाना-नानी पार्क ज्येष्ठ नागरिकांसाठी असले तरी सद्यस्थितीत मात्र दारुपार्टी,गांजा ओढणाऱ्या नशेबाज तरुणांचा अड्डा बनला आहे. ज्येष्ठ नागरिकांना शिविगाळ करण्याचा प्रकार नुकताच घडला आहे. मंचर पोलिसांनी अज्ञात तरुणांचा शोध घेऊन संबंधितावर कडक कारवाई करावी,अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांच्यावतीने होत आहे.

आंबेगाव तालुक्यातील पाच एकर जागेत असलेले  एकमेव नाना-नानी पार्क अवसरी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या पाठीमागे आहे. सुमारे ३५ ते ४० लाख रुपये खर्च करुन ग्रामपंचायतच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी नाना नानी पार्क उभारण्यात आले आहे. महादेव मंदिर परिसरात पाच एकर रिकाम्या जागेत ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक व तरुणांसाठी ओपन जिम उभारुन चांगली सोय केली आहे. पाच एकर जागेला संरक्षक भिंत,जागा सुधारणा,व्यायाम साहित्य,जॉगिंग ट्रॅक उभारण्यात आले आहे. पहाटे व संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक आणि महिला येथे फिरण्यासाठी व व्यायामासाठी येत असतात. स्थानिक तरुण सायंकाळी चार नंतर क्रिकेट हॉलीबॉल, व्यायाम करण्यासाठी येत असतात. मात्र गेली काही दिवसापासून अज्ञात तरुण मुले नाना नानी पार्कचा उपयोग दारुपार्टी, गांजा ओढण्यासाठी करत असल्याच्या ज्येष्ठ नागरिकांकडून तक्रारी आहेत.

-नागरिकांना शिविगाळ होण्याचे प्रकार
ज्येष्ठ नागरिक संबधित नशेबाज तरुणांना समजावण्यासाठी गेले असता ज्येष्ठ नागरिकांना दमदाटी व शिवीगाळ केल्याने येथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे ज्येष्ठ नागरिक महिला फिरण्यासाठी येत नाही. तसेच नाना-नानी पार्कमध्ये गवत आणि दगडी मोठ्या प्रमाणात असल्याने अस्वच्छता आढळुन येत आहे. नशेबाज तरुणांचा मंचर पोलिसांनी शोध करुन कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.