सुनेच्या छळ प्रकरणात फरार असलेल्या नानासाहेब गायकवाड मुलासह ताब्यात; पुणे पोलिसांची कर्नाटकात कारवाई

पिंपरी-चिंचवड पोलीसांनी याप्रकरणात गायकवाड यांच्यासह इतरांवर मोक्कानुसार कारवाई केली होती. त्यानंतर पुणे पोलीसांनी देखील त्यांच्यावर मोक्का कारवाई केली आहे.

    पुणे : सुनेचा छळ प्रकरणानंतर खंडणीचे गुन्हे दाखल झालेले तसेच पुणे आणि पिंपरी-चिचंवड शहर पोलीसांनी मोक्का कारवाई केलेले उद्योजक नानासाहेब गायकवाड तसेच त्यांचा मुलगा गणेश गायकवाड यांना पुणे पोलीसांनी सापळा रचून पकडले आहे. त्यांना कर्नाटक येथून पकडण्यात आले असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त देसाई यांनी दिली आहे. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

    नानासाहेब शंकरराव गायकवाड, गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड अशी पकडण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. पुण्यातील चतुश्रृंगी पोलीस ठाण्यासह पिंपरी-चिचंवड पोलीस ठाण्यात गायकवाड कुटुंब व इतरांवर गुन्हे दाखल आहेत. सुनेचा छळ केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर गायकवाड कुटुंबावर जमीन लाटण्यासोबतच बेकायदा सावकरकीचा गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, गुन्हे दाखल झाल्यानंतर नानासाहेब गायकवाड, पत्नी नंदा आणि मुलगा गणेश फरार झाले होते. तर, पोलीसांनी यापूर्वी तिघांना अटक केली होती. त्यात मुलगी व जावई तसेच इतर एकाचा समावेश आहे. पण, नानासाहेब गायकवाड व मुलगा पसार झाले होते.

    पिंपरी-चिंचवड पोलीसांनी याप्रकरणात गायकवाड यांच्यासह इतरांवर मोक्कानुसार कारवाई केली होती. त्यानंतर पुणे पोलीसांनी देखील त्यांच्यावर मोक्का कारवाई केली आहे. दरम्यान या तिघांचा शोध घेतला जात होता. त्यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त देसाई व त्यांच्या पथकाला तो कर्नाटक येथे असल्याचे माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त देसाई, सहाय्यक निरीक्षक चव्हाण, उपनिरीक्षक पंधरकर यांच्या पथकाने त्याला आज सायंकाळी कर्नाटक राज्यातून पकडले आहे. त्यांच्या अटकेची कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.