खेडमध्ये हाेणार राष्ट्रीय लोकअदालत

    राजगुरूनगर : येथील जिल्हा व सत्र न्यायालयात रविवारी (दि.१ ऑगस्ट) राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार करण्यात आले आहे. काेरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे डिसेंबर २०२० नंतर या लोकन्यायालयाचे आयोजन प्रथमच करण्यात येत आहे.

    गेल्या ७ महिन्यांत वाढलेली दाखल प्रकरणांची संख्या विचारात घेता जास्तीत जास्त प्रकरणांचा आपसात तडजोडीने निपटारा करण्यासाठी हे लोकन्यायालय महत्त्वाचे ठरणार आहे. एक हजार प्रकरणे या लोकन्यायालयात तडजोडीसाठी ठेवण्यात आली असून, अजूनही तडजोड योग्य दावे, फौजदारी खटले व दाखल पूर्व प्रकरणे जास्तीत जास्त प्रमाणात या लोकन्यायालयात ठेवण्यात यावी, असे आवाहन तालुका विधी सेवा समिती खेड व खेड वकील संघटना यांच्यातर्फे करण्यात येत आहे.

    ‘व्हाॅट्सऍप व्हिडिओ कॉलिंग’

    या लोकन्यायालयाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाने दिलेल्या परवानगीप्रमाणे लोकन्यायालयामध्ये ठेवलेल्या प्रकरणामध्ये तडजोड करण्यासाठी ‘व्हाॅट्सऍप व्हिडिओ कॉलिंगचा’ वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे जे पक्षकार वृद्धत्व, आजारपण किंवा अन्य अपरिहार्य कारणास्तव हजर राहू शकणार नसतील. त्यांनी या व्हाॅट्सऍप व्हिडिओ कॉलिंगचा फायदा घेऊन आपल्या प्रकरणांमध्ये तडजोड करावी. उपस्थित पक्षकारांनी कोव्हिड-१९ बाबत शासनाने  दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. जास्तीत जास्त लोकांनी या लोकन्यायालयाचा लाभ घेऊन जास्तीत जास्त प्रकरणात  तडजोड करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.