नाममात्र भाडेतत्त्वावर ‘नटराज’ला कोट्यवधीची जागा

  बारामती : बारामती नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुमताच्या जोरावर महत्त्वाचे विषय चर्चा न करता मंजूर केले आहेत. शहरातील कोट्यावधी रुपयांची जागा नाममात्र दराने नटराज नाट्य कला मंडळाला भाडेतत्त्वावर देण्याच्या विषयाला चर्चा न करताच मंजुरी दिली कशी, असा सवाल बारामती नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सुनिल सस्ते व नगरसेवक विष्णूपंत चौधर यांनी केला. याबाबत वेळप्रसंगी आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

  सभेच्या प्रोसिडींगमध्ये अक्षम्य चुका

  बारामती नगरपालिकेची सर्वसाधारण सभा दि. २८ मे रोजी व्हिडिओ कॉन्फोरन्सद्वारे झाली. या संदर्भात सस्ते यांनी पत्रकार परिषद आयोजित करून सत्ताधारी गटावर ताशेरे ओढले. सस्ते म्हणाले,  दि. ६ जानेवारी रोजी सर्वसाधारण सभा झाल्यानंतर दि. २५ फेब्रुवारी २०२१ ला नगरपालिकेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा पार पडली. वास्तविक पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी दि. २८ फेब्रुवारी पूर्वी सर्वसाधारण सभा घेण्याचे आदेश दिले होते. दरम्यान ६ जानेवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या प्रोसिडींगमध्ये अक्षम्य चुका आहेत. स्वीकृत सदस्यांना अनुमोदन देण्याचा अधिकार नसताना अनुमोदक म्हणून त्यांची सही आहे. या गोष्टीचा आपण निषेध केला आहे. यापूर्वीच्या सभेमध्ये नगरपालिकेने ठेव तत्त्वावर कामे न देण्याचा निर्णय घेतला असताना प्रत्यक्षात सार्वजनिक बांधकाम खात्याला ठेव तत्त्वावर कामे दिली आहेत.

  नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱ्यांनी बाळगले मौन

  दि. २८ मे रोजी झालेल्या सभेत विषय क्रमांक १८ नुसार नटराज नाट्य कला मंडळाच्या अर्जानुसार निरा डावा कालव्यालगतची १८३.९० चौ.मी. रिकामी जागा नाममात्र भाडे तत्त्वाने देण्याची मागणी केली होती. या मागणीबाबत विचार करणे व निर्णय घेणे या महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित होते. आपण यावेळी जागा देण्यापूर्वी संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत, याची माहिती सदस्यांना द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र या मागणीबाबत नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी मौन बाळगले. सुमारे ३५ कोटी रुपये किमतीची ही जागा नटराज नाट्य कलामंडळाला १०० रुपये वार्षिक भाड्यानुसार देण्याचा निर्णय घाईघाईत मंजूर करण्यात आला. मात्र यानंतरच्या ११ विषयांवर वाचून चर्चा होऊन घेणे गरजेचे होते. मात्र १८ व्या विषयानंतर राष्ट्रगीत होऊन सभा संपविण्यात आल्याचा आरोप सुनिल सस्ते यांनी यावेळी केला.

  रूई गावठाणात दोन दिवसाआड पाणीपुरवठा

  रूई भागातील गावठाणात राहणाऱ्या नागरिकांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे, तरीदेखील या ठिकाणच्या पाण्याच्या टाकीतून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या नवीन इमारतीसाठी पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे विष्णूपंत चौधर यांनी सांगितले. गावच्या वतनदारांना पाणी मिळत नसताना नवीन बिल्डरांना लगेच पाण्याची व्यवस्था केली जात आहे, ही मोठी दुर्दैवी बाब असल्याचे चौधर म्हणाले. सिनेमा रोडवरील नगरपालिकेने ९९ वर्षांच्या भाडेकरार नाम्यानुसार दिलेल्या जागा संबंधित भाडेकरूंना रेडिरेकनरच्या ५० टक्के रक्कम भरून भाडेकरूंच्या मालकीच्या करण्याबाबतचा शासन आदेश आहे. तरी देखील नगरपालिका प्रशासन चालढकल करीत असल्याचे सस्ते यांनी सांगितले.