निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई जास्तीत जास्त देण्यासाठी प्रयत्न करणार : दिलीप वळसे पाटील

भिमाशंकर : निसर्ग चक्रीवादळामुळे आंबा, हिरडा, टोमॅटो आदि विविध फळांचे तसेच कांदा चाळ, पोल्ट्री फॉर्म, केळी व घरांचे झालेले नुकसान यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत भरपाईची रक्कम वाढवून देण्यासाठी

भिमाशंकर : निसर्ग चक्रीवादळामुळे आंबा, हिरडा, टोमॅटो आदि विविध फळांचे तसेच कांदा चाळ, पोल्ट्री फॉर्म, केळी व घरांचे झालेले नुकसान यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत भरपाईची रक्कम वाढवून देण्यासाठी १३ मे २०१५ च्या जी. आर. मध्ये दुरूस्ती करण्यात येणार आहे, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. 

आंबेगाव तालुक्यातील गोनवडी, डिंभे, कोलदरे, आमोंडी, तळेघर आदि गावांमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे   घरांची, नुकसानग्रस्त शेतीची व इतर नुकसानीची पहाणी दिलीप वळसे पाटील व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. त्यावेळी शेतक-यांना धीर देत वळसे पाटील बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देवदत्त निकम, कैलासबुवा काळे, जिल्हा परीषद सदस्या रूपाली जगदाळे, सभापती संजय गवारी, तहसिलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालींदर पठारे, तालुका कृषी अधिकारी टी. के. चौधरी, विदयुत उपअभियंता नवनाथ घाटुळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार, माजी उपसभापती नंदकुमार सोनावले, भीमाशंकर कारखाना संचालक अक्षय काळे आदि उपस्थित होते. 

आदिवासी शेतक-यांचे हिरडा हे प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे तोडून ठेवलेला हिरडा भिजला तर हिरडयांची अनेक झाडे मोडून गेली. इतर पिकांबरोबर हिरडयाच्या नुकसानीचे पंचनामे करावेत, हिरडयांच्या झाडांची ७/१२ नोंद घेण्यात यावी झालेल्या नुकसानीची आकडेवारी निश्चित करून एकुण निधी किती मिळाला पाहिजे यांची सविस्तर माहिती कळवावी आदि विविध सुचना संबंधित अधिका-यांना वळसे पाटील यांनी दिल्या.  

आंबेगाव तालुक्यात निसर्ग चक्रिवादळामुळे ३४ प्राथमिक शाळांचे, २८ अंगणवाडी इमारतींचे, ६ प्राथमिक आरोग्य केद्र, विदयुत मंडळाचे आदिंचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तर शेतक-यांच्या शेतीमालाचे, घरांचे नुकसान झाले आहेत त्यातील बहुतेक नागरिकांचे पंचनामे झाले आहेत. तर काहींचे पंचनामे करण्याचे काम चालू आहे.     

चौकट – आंबेगाव तालुक्यामध्ये चक्रिवादळामुळे शेतक-यांच्या शेतीचे, झाडांचे, घरांचे जे नुकसान झाले आहे. याची सविस्तर माहिती आपल्याकडे येणारे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांना व्यवस्थित दयावी. यामध्ये आपले नाव, बॅंक खाते नंबर, आधार कार्ड नंबर आदिंची माहिती नुकसानग्रस्त नागरिकांनी भरून दयावी आणि प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तहसिलदार रमा जोशी व गटविकास अधिकारी जालींदर पठारे यांनी केले.