नवरात्रोत्सवामुळे नारळ खातोय ‘भाव’ ; पुण्यात दिवसाला दीड ते दोन लाख नारळांची विक्री

-दसऱ्यापर्यंत नारळांसाठीची मागणी कायम राहण्याची शक्यता

  पुणे : शहरातील सर्वच मंदिरांचे दरवाजे उघडल्याने आणि नवरात्रोत्सवामुळे नारळाला ‘भाव’ आला आहे. पुण्यात दिवसाला दीड ते दोन लाख नारळांची विक्री होत असून, सध्या नारळांचा पुरवठा कमी झाल्याने त्याच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. दसऱ्यापर्यंत नारळांसाठीची मागणी कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

  राज्यातील सर्वच मंदिरे आणि प्रार्थनास्थळे घटनस्थापनेपासून पुन्हा खुली झाली. पहिल्या दिवसापासून सर्व प्रार्थनास्थळांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असून, पूजा; तसेच तोरणासाठी नारळांना मागणी वाढली असल्याचे निरीक्षण व्यापाऱ्यांनी नोंदविले आहे. मागणीच्या तुलनेत नारळांचा पुरवठा कमी असून, त्याचे दर काही प्रमाणात वाढले आहेत.

  ‘नारळाचे उत्पादन प्रामुख्याने तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशात होते. त्यामुळे पुण्यासह महाराष्ट्रात या भागातून मोठ्या प्रमाणात दररोज आवक होत आहे. पुण्यात दररोज अडीच ते तीन लाख नारळांची अर्थात, अडीच हजार पोत्यांची आवक होते. तमिळनाडूत नुकत्याच झालेल्या पावसाने नारळाचा पुरवठा खंडित झाला होता. तोडणी, लोडिंग करण्यासाठी कामगार मिळत नाहीत. उत्पादन असून नारळांचा पुरवठा होत नसल्याने दरवाढ झाली आहे,’ अशी माहिती नारळाचे व्यापारी दीपक बोरा यांनी दिली.

  कामगारांचा वाढलेला खर्च, डिझेलचे वाढलेले दर; तसेच वाहनांचे भाडे वाढल्याने नारळाच्या शेकड्याच्या दरामागे वाढ होण्यास कारणीभूत ठरले आहेत. त्यामुळे शेकड्यामागे १५० ते २०० रुपयांची वाढ झाली आहे. येत्या शुक्रवारी दसरा असून, त्यामुळे नारळाचे दर कमी होण्याची शक्यता सध्या दिसत नाही. तमिळनाडू येथून येणाऱ्या नव्या नारळाच्या दरात १५० ते २०० रुपयांची, तर कर्नाटकातील नारळाच्या दरात ५० ते १०० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या सणासुदीचा काळ असला, तरी शहरांमधील हॉटेल, खानावळी सुरू झाल्या आहेत. मिठाई उत्पादकांचा व्यवसाय सुरू झाल्याने त्यांच्याकडून नारळाला मागणी वाढली आहे, असेही बोरा यांनी स्पष्ट केले.

  महाराष्ट्रात नारळाची मागणी दररोज तीन लाखांपर्यंत होत आहे. त्या तुलनेत एकट्या पुणे जिल्ह्यात दीड ते दोन लाख नारळाची दररोज विक्री होते, तर उर्वरीत विक्री महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत होत आहे. त्यामुळे नारळाचा पुरवठा वाढण्याची अपेक्षा आहे.

  - दीपक बोरा, नारळाचे घाऊक व्यापारी, मार्केट यार्ड