नाझरे धरण १०० टक्के भरले

जेजुरी, मोरगावसह ४९ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला

जेजुरी: जेजुरी व मोरगावसह ४९ गावांना पाणी पुरवठा करणार्‍या नाझरे (मल्हार सागर) धरण १०० टक्के भरले आहे. यामुळे जेजुरी शहर,औद्योगिक वसाहत,मोरगावसह सुमारे ४९ गावांच्या पिण्याचे पाण्यासह शेती सिंचनाचा वर्षभराचा प्रश्न मिटला आहे. नाझरे धरणाची क्षमता ७८८ दशलक्ष घनफूट(पाऊण टिएमसी) एवढी आहे. रविवारी ( दि.१६ ) सकाळी दहा वाजता धरण पुर्ण क्षमतेने भरले. कर्‍हा नदी पात्रात १८०० क्युसेक वेगाने विसर्ग सुरु आहे. पुरंदरच्या पश्चिम खोर्‍यात पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात वाढ करण्यात येणार असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे शाखा अभियंता एस.बी.चवलंग व विश्वास पवार यांनी सांगितले. रविवारी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले. यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक डॉ.दिगंबर दुर्गाडे,नगराध्यक्षा वीणा सोनावणे, जि.प.सदस्य दत्ता झुरंगे, मुख्याधिकारी पुनम शिंदे, सुनिता कोलते,गणेश जगताप आदी उपस्थित होते.