लोणी काळभोर परिसरात महिला सरपंचाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून मारहाण

    पुणे : लोणी काळभोर परिसरातील कदमवाक वस्तीच्या महिला सरपचांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, लसीकरण केंद्राच्या श्रेयवादावरून हा प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

    याप्रकरणी सरपंच गौरी गायकवाड (वय ४०, रा. कदमवाकवस्ती) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, सुजित काळभोर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर सुजित काळभोर यांच्या तक्रारीवरून गौरी चित्तरंजन गायकवाड, अविनाश बडदे, सचिन अरविंद काळभोर, महेश ज्ञानेश्वर काळभोर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

    गौरी गायकवाड यांच्या तक्रारीनुसार, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील संभाजीनगर परिसरात एंजल हायस्कूल येथे आरोग्य विभागामार्फत कोरोना लसीकरणाचे आयोजन केले होते. शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एंजल हायस्कूल येथे त्या उपस्थित होत्या. त्यावेळी सुजित काळभोर तेथे आला. यावेळी अविनाश बडदे व त्याच्यात शब्दिक वाद झाला. वादाचे रुपांतर मारहाणीत होऊन सुजित काळभोरने गायकवाड यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. सरपंच या नात्याने ते भांडण सोडवण्यास गेल्या असता त्यांनाही मारहाण करत शिवीगाळ केली.

    तर, सुजित काळभोर यांच्या तक्रारीनुसार, अविनाश बडदे यांनी दम भरल्याने शाब्दिक वाद झाला. त्याठिकाणी गौरी गायकवाड आल्या व त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघांत हाणामारी सुरु झाली. त्यानंतर तेथे सचिन काळभोर, महेश काळभोर आले व या चौघांनी मिळून हाताने मारहाण केली. अधिक तपास महिला उपनिरीक्षक अमृता काटे करत आहेत.