उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थनार्थ बारामतीत राष्ट्रवादीचे आंदोलन

उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्याविरोधात आयकर विभागाने छापेमारी सुरू केल्याने उपमुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ बारामती शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बारामती शहरातील भिगवण चौक याठिकाणी आंदोलन करण्यात आले.

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्याविरोधात आयकर विभागाने छापेमारी सुरू केल्याने उपमुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ बारामती शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बारामती शहरातील भिगवण चौक याठिकाणी आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार व आयकर विभागाचा तीव्र निषेध करण्यात आला.

    राज्यात आयकर विभागाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर दोन दिवसांपासून छापेमारी सुरु केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयासह पवार यांच्या भगिनी विजया पाटील यांच्या कंपनीवर आयकर विभागाने छापा टाकला होता. त्याचबरोबर दुसऱ्या भगिनी नीता पाटील, रजनी इंदूलकर यांच्या घरीही छापा टाकला होता. आयकर विभागाने केलेली कारवाई ही राजकीय द्वेषातून व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बदनाम करण्याच्या हेतूने केली असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी आयकर विभागाचा व केंद्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. अजित पवारांच्या समर्थनार्थ यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.

    “अजितदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है”…. “हमारा नेता कैसा हो अजितदादा जैसा हो” अशी घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान बारामती शहरातील भिगवण चौक या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती शहर व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते. त्यानंतर आता अजित पवार यांच्या समर्थनार्थ बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले आहेत.

    आज सकाळी बारामती भिगवण चौक येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.