छापेमारीच्या कारवाईबाबत शरद पवार यांचं मोठं विधान; म्हणाले, ‘ही तर…’

काही लोक आरोप करून, भाषण करून काहीही बोलतात. मात्र, ते बोलल्यानंतर काही वेळातच केंद्रीय यंत्रणा कारवाई करण्यासाठी पुढे येतात. हे सगळ्यात आक्षेपार्ह आहे, असे शरद पवार किरीट सोमय्या यांचे नाव न घेता म्हणाले.

  बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : दिल्लीतील शेतकर्‍यांवर झालेला हल्ला हा जालियनवाला बागेसारखाचा आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने ‘महाराष्ट्र बंद’चे आयोजन केले. या संतापातूनच केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून छापेमारी सुरू केली असल्याची शक्यता येत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

  आयकर विभागाने गुरुवारी (दि.७) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या काही नातेवाईकांच्या आणि निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर आणि घरावर छापेमारी केली. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी भाजपवर टीका केली.

  बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना पवार म्हणाले, उत्तर प्रदेशच्या घटनेवर माझ्यासह सर्व सहकाऱ्यांनी कठोर भूमिका घेतली होती. तेथे सात ते आठ शेतकऱ्यांना चिरडले गेले. अशी घटना यापूर्वी कधी घडली नव्हती. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत निषेध केला आहे. शेतकऱ्यांवर झालेला हल्ला हा जालियनवाला बागेसारखाच होता. याच हल्लाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचे आयोजन करण्यात आले. त्यातून संतापून ही कारवाई केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी टीका पवार यांनी यावेळी केली.

  आयकर भरण्यासंदर्भात संस्थांमध्ये काही शंका असतील तर त्या संदर्भात तपासणी करण्याचा त्यांचा अधिकार आहे. मात्र, ज्यांच्या व्यवहाराची चौकशी करायची आहे, त्या व्यवहारात संबंध नसलेल्या कुटुंबातील मुलींच्यासुध्दा चौकशी करण्यात आल्या आहेत.

  ‘मला असं वाटतं की, हा सत्तेच्या अधिकाराचा अतिरेक आहे. त्यामुळे लोकांनी त्याचा विचार केला पाहिजे की, अशाप्रकारे अधिकारांचा गैरवापर आपण कितीवेळा सहन करायचा,असा सवाल पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

  काही लोक आरोप करून, भाषण करून काहीही बोलतात. मात्र, ते बोलल्यानंतर काही वेळातच केंद्रीय यंत्रणा कारवाई करण्यासाठी पुढे येतात. हे सगळ्यात आक्षेपार्ह आहे, असे शरद पवार किरीट सोमय्या यांचे नाव न घेता म्हणाले.