खोटी आश्वासने, थापा मारून केंद्राने देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली : संभाजी होळकर

    बारामती : सध्या पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, त्यास केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा आरोप बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. या दरवाढीच्या विरोधात शासकीय मध्यवर्ती कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
    राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी ‌होळकर म्हणाले, केंद्र सरकारने जनतेला खोटी आश्वासने व थापा मारून गेल्या सात वर्षांपासून देशाच्या अर्थव्यवस्थेची पूर्णपणे वाट लावली आहे. पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅसच्या किंमती प्रचंड प्रमाणात वाढवून सर्वसामान्य जनतेचे जीवन आर्थिकदृष्ट्या विस्कळीत केले आहे. या सर्व बाबींमुळे कधी नव्हती एवढी महागाई वाढलेली आहे. अशा परिस्थितीत सामान्य जनता अस्वस्थ झाली आहे. नवीन रोजगारनिर्मिती न करता लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत.
    अनेक वेगवेगळ्या प्रकारची करवाढ लावून प्रचंड दरवाढ करून गोरगरीब जनतेच्या तोंडातील घास काढण्याचे महापाप या सरकारने केले आहे. अशा सामान्य गोरगरीब जनतेशी असंवेदनशीलपणे वागणाऱ्या या केंद्र सरकारचा बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करीत असल्याचे संभाजी होळकर यांनी सांगितले. डिझेल व घरगुती गॅस दरवाढ कमी करावी, अशा मागणीचे निवेदन केंद्र सरकार दरबारी पोहचवावे म्हणून प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना देण्यात आले.
    यावेळी इम्तियाज शिकीलकर,विश्वासराव देवकाते, बाळासाहेब तावरे, मदन देवकते, प्रमोद काकडे ,नीता फरांदे, पौर्णिमा तावरे,रोहित कोकरे,प्रशांत काटे, शिवाजीराव टेंगले, संदीप जगताप,वसंत गावडे, धनवान वदक राजवर्धन शिंदे, राहुल वाबळे, अमर धुमाळ यांच्यासह सर्व संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.