राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे पुण्यात निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शुक्रवारी रुग्णालयात जाऊन भारत भालके (MLA Bharat Bhalke) यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर रात्री उशिरा भालके यांची प्राणज्योत मालवली असून राष्ट्रवादीसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे.

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके (MLA Bharat Bhalke) यांचे काल शुक्रवारी पुण्यात (Pune)  निधन झाले. पुण्यातील रूबी (Rubi Hospital) रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. भारत भालके हे ६० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे. भालके यांच्या पार्थिवावर पंढरपुरातील सरकोली येथे आज शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी रुग्णालयात जाऊन भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर रात्री उशिरा भालके यांची प्राणज्योत मालवली असून राष्ट्रवादीसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. दांडगा जनसंपर्क असलेले भारत भालके यांनी विधानसभेवर निवडून जाण्याची हॅट्ट्रिक केली होती. भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक होती.

गेल्या काही दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र, त्यात यश आले नाही आणि शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भालके यांनी अखेरचा श्वास घेतला. भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते.

शरद पवारांनी व्यक्त केल्या सहवेदना


१९९२ साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. २००२ पासून त्यांनी या कारखान्याच्या अध्यक्षपदावर आजपर्यंत कायम वर्चस्व ठेवले.