राष्ट्रवादीने खोट्या प्रसिध्दीसाठी फ्लेक्सबाजी करण्यापूर्वी अगोदर खातरजमा करावी; नामदेव ढाकेंचा सल्ला

    पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसने फ्लेक्सबाजी करुन नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याऐवजी प्रत्यक्ष खातरजमा करुनच खोटी प्रसिध्दी मिळवायचे व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे थांबवावे, असे राष्ट्रवादीने केलेल्या आरोपास सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी प्रतिउत्तर दिले.

    पिंपरी-चिंचवड शहरात कोविड -१९ बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रुग्णांना उपचारासाठी प्लाझ्माची गरज भासत होती. त्यावेळी कोरोनामुक्त रुग्ण प्लाझ्मादानासाठी आवाहन करुनही स्वंयस्फूर्तीने पुढे येत नव्हते. त्यासाठी एप्रिल महिन्यामध्ये प्लाझ्मादान करणाऱ्या व्यक्तीस महापालिकेकडून दोन हजार रुपये प्रोत्साहनपर देण्यात येतील, अशी घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे ३४१ लोकांनी प्लाझ्मादान केला आहे. हा शब्द पाळत आजअखेर वायसीएम रुग्णालयात प्लाझ्मादान केलेल्या एकूण ३४१ व्यक्तींपैकी जवळपास १५० व्यक्तींच्या थेट खात्यावर ६ जूनलाच रक्कम जमा करण्यात आली.

    उर्वरित व्यक्तींच्या खात्यावर लवकरच रक्कम जमा करण्याची कार्यवाही पूर्ण होईल. यामध्ये एकाही व्यक्तीला वंचित ठेवले जाणार नाही. त्याचबरोबर खाजगी रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांना दिलेल्या शब्दाप्रमाणे एप्रिल महिन्यापासून मोफत प्लाझ्मा पुरविण्यात येत असून, त्यांचेकडून कोणतीही रक्कम आकारली जात नाही. शिवाय कोरोनाबाधित रुग्ण मृत झाल्यास त्यांच्या अंत्यविधीसाठी होणारा संपूर्ण सरपणाचा खर्चही महापालिकेच्या वतीनेच करण्यात येत आहे. तसेच पिंपरी-चिंचवडमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना तीन हजार रुपये मदत देण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने एकमताने घेतला. त्यावेळी सर्वसाधारण सभेमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी व सदस्यही उपस्थित होते. यावेळी या निर्णयाचे राष्ट्रवादीने विरोध न दर्शविता स्वागतच केले होते.

    एखाद्या आपत्तीच्यावेळी जनतेला अशी आर्थिक मदत देण्याची महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम ६६ मधील अ.क्र. ३९ वर स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे. याबाबत अशी मदत देता येईल किंवा नाही याची शहानिशा करूनच गोरगरीब कुटुंबांपर्यंत ही मदत देण्याचा विषय पारित केला आहे. यासाठी आम्ही गेल्या दोन महिन्यांपासून या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्तांकडे पाठपुरावा करीत आहोत. परंतु, आयुक्त शब्द व पत्रांचा खेळ करत ही योजना राबविण्यासाठी टाळाटाळ व चालढकल करत आहेत. यामागे श्रेयवादासाठी व आगामी महापालिका निवडणूकीवर डोळा ठेवून आयुक्तांवर दबाब टाकला जातोय हे उघड गुपित आहे.

    आम्हाला आपत्तीच्या काळात गोरगरीबांना मदत मिळवून द्यायचीच आहे. त्यासाठी भाजप कायम पुढाकार घेत असून, गरिबांना मदत करण्याचे शहाणपण राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी आम्हाला शिकवू नये, असा खोचक टोला नामदेव ढाके यांनी लगावला.