खेड पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे अरुण चौधरी बिनविरोध ; अखेर १०१ दिवसांचा वनवास संपला

सभापतीपदासाठी खेड पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत (दि. ३१ ऑगस्ट) सभापतीपदासाठी दोन अर्ज दाखल झाले होते. या निवडीमुळे २४ मे पासून राजकीय सहलीवर असलेल्या सर्वपक्षीय सदस्यांचा वनवास अखेर १०१ दिवसांनी संपला. स्पष्ट बहुमत असतानाही सत्ता गेल्याने शिवसेनेची नाचक्की झाली. खेडमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने याचे पडसाद भविष्यात सर्व निवडणुकांत पडणार असल्याचे या निवडणुकीने सिद्ध झाले.

    राजगुरुनगर : खेड तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण चौधरी यांची बिनविरोध निवड झाली.  शिवसेनेचे विद्यमान सभापती भगवान पोखरकर यांचा अर्ज बाद झाला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा खेड उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.

    सभापतीपदासाठी खेड पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत (दि. ३१ ऑगस्ट) सभापतीपदासाठी दोन अर्ज दाखल झाले होते. या निवडीमुळे २४ मे पासून राजकीय सहलीवर असलेल्या सर्वपक्षीय सदस्यांचा वनवास अखेर १०१ दिवसांनी संपला. स्पष्ट बहुमत असतानाही सत्ता गेल्याने शिवसेनेची नाचक्की झाली. खेडमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने याचे पडसाद भविष्यात सर्व निवडणुकांत पडणार असल्याचे या निवडणुकीने सिद्ध झाले.

    निवडीनंतर आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते अरुण चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, प्रभारी सभापती चांगदेव शिवेकर, बाजार समिती सभापती विनायक घुमटकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे, माजी सभापती रामदास ठाकूर, राष्ट्रवादी पदाधिकारी कैलास सांडभोर, कैलास लिंभोरे, अरुण चांभारे, मयूर मोहिते, उमेश गाडे, सुभाष होले, हेमलता टाकळकर यांच्यासह सर्व पंचायत समिती सदस्य आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार मोहिते म्हणाले की भगवान पोखरकर हे सभापती होण्यासाठी माझे पाया पडले होते. मात्र त्यांनी विश्वासघात केला. त्यांच्यावर अनेक फौजदारी गुन्हे दाखल आहेत. ते सध्या तुरुंगात असून माझ्या हत्येचा कट रचत आहे, अशी मला खात्रीशीर माहिती मिळाली आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर खटला भरणार आहे. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यावरही त्यांनी खरपूस टीका केली. जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूका पुढे ढकलल्याने यापुढे अधिक लोकांना पदाधिकारी होण्याची संधी मिळेल, असेही सुचोवत आमदार दिलीप मोहिते यांनी यावेळी केले.

    या निवडणुकीसाठी पंचायत समितीच्या परीसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. ५०० मीटर परिघात वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांची खूप पायपीट झाली. मंगळवारी पंचायत समिती वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र प्रवेश बंद असल्याने अनेकांची गैरसोय झाली.