Nitin Gadkari

महाराष्ट्रात या रस्त्याचे काम राहिले आहे. हा रस्ता पुढे जेएनपीटीपर्यंत पुढे नेला जाणार आहे. वसई-विरारपासून वरळीपर्यंत हा रस्ता जोडला तर नरीमन पॉईंटवरुन दिल्लीला बारा तासात पोहोचता येईल.

    पुणे : मी दिल्लीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताे. राज्यातील विविध विकासकामांसाठी (Development Works) केंद्र सरकारकडून आवश्यक ते सहकार्य, परवानगी मिळवून दिली जाईल. राज्यातील विविध रस्ते वाहतुकीच्या प्रश्नांसदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबराेबर बैठक घेण्यात येईल. यातून मुंबई ते दिल्ली महामार्गाबराेबरच इतर रस्त्यांची कामे मार्गी लावली जातील, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुण्यात स्पष्ट केले.

    पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील नियाेजित उड्डाणपूल आणि कात्रज येथील उड्डाणपुलाचे भूमिपूजन, विविध प्रकल्पांचे लाेकार्पण गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परीषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गाेऱ्हे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापाैर मुरलीधर माेहाेळ, खासदार गिरीष बापट, सुप्रिया सुळे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, माजी आमदार याेगेश टिळेकर आदी उपस्थित हाेते.

    याप्रसंगी बाेलताना गडकरी यांनी रस्ते बांधणी, वाहतुक,  इथेनाॅलचा वापर आदी विषयांवर सुरु असलेल्या कामांची माहिती दिली. ‘‘मुंबईतील वरळी- बांद्रा सी लिंकशी इमोशनल नातं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वात या पुलाची जबाबदारी मला मिळाली. मला खूप शिकायला मिळालं. सी लिंक वसई -विरारपर्यंत न्यायचा माझी इच्छा होती. पण महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीमुळे झालं नाही. मुंबई ते दिल्ली या महामार्गाचे काम सध्या सुरू असून, त्याचे काम ७० टक्के झाले आहे.

    तसेच महाराष्ट्रात या रस्त्याचे काम राहिले आहे. हा रस्ता पुढे जेएनपीटीपर्यंत पुढे नेला जाणार आहे. वसई-विरारपासून वरळीपर्यंत हा रस्ता जोडला तर नरीमन पॉईंटवरुन दिल्लीला बारा तासात पोहोचता येईल. माझ्या खात्याकडे खूप पैसे आहेत, दिल्लीला नरीमन पॉईंटशी जोडून देण्याचं काम मी नक्की करेन, तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलून प्रस्ताव तयार करा, असं आवाहन गडकरी यांनी केलं.