पुण्यातील सीओईपी जंबो हॉस्पीटलमध्ये नवीन रुग्णांना प्रवेश बंद ; जंबो हॉस्पीटल ऐवजी डॉ. नायडू व पालिकेच्या अन्य रुग्णालयात केले जाणार उपचार

- रुबल अग्रवाल, अतिरिक्त महापालिका आयुक्त यांची माहिती

  पुणे : शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने उद्यापासून (दि.१५) शिवाजीनगर येथील सीओईपी जंबो कोव्हिड हॉस्पीटलमध्ये नवीन रुग्णांना प्रवेश देणे बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी नवीन रुग्ण बाणेर कोव्हिड हॉस्पीटल तसेच डॉ. नायडू हॉस्पीटलमध्ये दाखल करून घेण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

  शहरामध्ये ऍक्टीव्ह कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांपर्यंत कमी झाली आहे. यापैकी सुमारे एक हजार रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत असून उर्वरीत रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. ससून व महापालिकेच्या कोव्हिड स्पेशल रुग्णालयांसोबतच खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनावरिल उपचारासांची सुविधा आहे. तूर्तास डॉ. नायडू, बाणेर कोव्हिड रुग्णालय, दळवी हॉस्पीटल, मुरलीधर लायगुडे हॉस्पीटल, ई.एस.आय. रुग्णालय, गणेश कला क्रिडा येथील रुग्णालयासह सीओईपी जंबो हॉस्पीटलमधील अनेक बेडस् रिक्त झाले आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्याने मनुष्यबळ व आवश्यक सुविधांचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने जंबो हॉस्पीटलमध्ये उद्यापासून २२ जूनपर्यंत नवीन रुग्णांना प्रवेश देणे बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी नायडू, बाणेर, लायगुडे आणि लायगुडे रुग्णालयात नवीन रुग्णांना उचपारासाठी पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

  सीओईपी जंबो रुग्णालयाच्या स्टॅबिलिटी रिपोर्टनुसार तेथे १५ जुलैपर्यंत वापरास परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे २२ जूनला शहरातील रुग्णसंख्या विचारात घेउन पुढील निर्णय घेण्यात येईल. यासोबतच तात्पुरती व्यवस्था म्हणून उभारलेल्या हॉस्पीटलबाबतही आढावा घेउन निर्णय घेण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

  शहरात १० टक्के बालरुग्ण
  पुणे शहरातमध्ये दुसर्‍या लाटेमध्ये अडीच लाख कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये १८ वर्षाखालील रुग्णांचे प्रमाण साधारण १० टक्के होते. आजमितीला ४७८ लहान मुले कोरोना बाधित असून त्यापैकी ९ जण ऑक्सीजनवर आहेत. यापैकी बहुतांश मुलांना इतर आजार आहेत. दरम्यान खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या ४ वर्षाच्या मुलीची प्रकृति अतिशय गंभीर होती. तिला टॉसिलीझ्युमॅब इंजेक्शन दिल्यानंतर तिच्या प्रकृतिमध्ये चांगली सुधारणा झाल्याची माहितीही रुबल अग्रवाल यांनी यावेळी दिली.

  कोरोना रुग्णांचे क्षेत्रिय कार्यालय पातळीवर होणार नियोजन
  कोरोना रुग्णांचे क्षेत्रिय कार्यालय पातळीवर नियोजन करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने गरोदर महिला, लहान मुलांवरील उपचार व विलगीकरण कक्षांची व्यवस्था क्षेत्रिय कार्यालय अथवा वॉर्डपातळीवर करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी प्रशासनाच्यावतीने पावले उचलण्यात येत असून लवकरच हे नियोजनही जाहीर करण्यात येईल, अशी माहिती रुबल अग्रवाल यांनी यावेळी दिली.