निगडी, दिघीत ऑनलाइन जुगारावर छापा; ७२ हजाराचा मुद्देमाल जप्त

देहूफाटा - आळंदी येथील काळे पेट्रोल पंपाजवळ आरोपी यांनी स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररित्या मोबाईलच्या व्हाट्सअप ग्रुपवर ऑनलाइन जुगाराची आकडेवारी घेतली. ती आकडेवारी पंढरीनाथ याच्या मोबाईलवर पाठवून ऑनलाइन जुगार खेळत असताना मिळून आले.

    पिंपरी: ऑनलाईन जुगार खेळवणाऱ्या तसेच ऑनलाइन जुगार घेणाऱ्या दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे मारले. दोन्ही प्रकरणात पाच जणां विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    निगडी पोलीस ठाण्यात महेश केशव शिरसाठ (वय २६ रा. मोरेवस्ती, चिखली) आणि हिमांशु कुमार गुप्ता (वय २० रा. यमुनानगर, निगडी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी सुधीर डोळस यांनी फिर्याद दिली आहे. निगडीतील टिळक चौक, पवळे उड्डाणपुलाजवळ बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास ऑनलाइन लॉटरी जुगार खेळताना दोघेजण मिळून आले. लॉटरी सेंटरचे चालक मालक हे कामगार लोकांना कोणतीही संगणक पावती न देता हस्तलिखित पावतीवर आकडे लिहून देत होते.

    दिघी पोलीस ठाण्यात आकाश राजेंद्र डुनगे (वय २४), बालाजी राजेश बिडकर (वय ४० (दोघे रा. काळे कॉलनी, देहूफाटा, आळंदी) आणि पंढरीनाथ सूर्यवंशी उर्पâ पाटील (रा. गजानननगर, दिघी) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट तीनचे कर्मचारी शशिकांत नांगरे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी देहूफाटा – आळंदी येथील काळे पेट्रोल पंपाजवळ आरोपी यांनी स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररित्या मोबाईलच्या व्हाट्सअप ग्रुपवर ऑनलाइन जुगाराची आकडेवारी घेतली. ती आकडेवारी पंढरीनाथ याच्या मोबाईलवर पाठवून ऑनलाइन जुगार खेळत असताना मिळून आले. त्यांच्याकडून १४ हजारांचे मोबाईल आणि तीन हजारांची रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    नाणेकरवाडीत व्हीडीओ गेमवर जुगार

    नाणेकरवाडी येथे जुगार अड्ड्यावर केलेल्या कारवाईत रामेश्वर बिभीषण घोळवे (वय २७, भोसरी), व्यंकट चंद्रकांत भिसे (वय २८, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक मनोज साबळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नाणेकरवाडी येथील तळेगाव चौकात एका पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी व्हिडीओ गेमवर पैसे लावून जुगार खेळत आणि खेळवत होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता या जुगार अड्ड्यावर छापा मारण्यात आला. कारवाईमध्ये ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. चाकण पोलीस तपास करत आहेत.