गणेशोत्सवात खरंच संचारबंदी आहे का? तर पुणे पोलिस म्हणतात…

वैभवशाली गणेशोत्सवाला उद्यापासून (शुक्रवार) सुरुवात होणार असून, यानिमित्ताने पुणे पोलिसांनी संचारबंदी लागू केली असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर पुणे पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे.

    पुणे : वैभवशाली गणेशोत्सवाला उद्यापासून (शुक्रवार) सुरुवात होणार असून, यानिमित्ताने पुणे पोलिसांनी संचारबंदी लागू केली असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे पुणेकर चिंतेत अन् संभ्रमात पडले आहेत. मात्र, संचारबंदी नसल्याचे स्पष्टीकरण पुणे पोलिसांनी दिले आहे. दरम्यान 7 हजार पोलिसांचा खडा पहारा असणार आहे. यंदा कोरोना संकट असल्याने अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. तरीही पुणे पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेत या बंदोबस्ताची आखणी केली आहे.

    पुण्यात गणेशोत्सव म्हटल्यानंतर गर्दीने फुललेले रस्ते, सर्वत्र कार्यकर्त्यांची रेलचेल आणि लगभग दिसून येते. मध्यवस्तीत तर तुडूंब गर्दी असते. दरवर्षीच हे चित्र गेल्या वर्षीपासून दिसत नाही. कोरोना संकटाने गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा केला जात आहे. त्यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी यंदा गणेश मंडळासाठी देखील नियमावली बनवली आहे. त्यामुळे या सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे. असे असले तरी पोलिसांनी पूर्ण खबरदारी म्हणून शहरात 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. त्यात 7 हजार पोलीस कर्मचारी, 700 पोलीस अधिकारी, शीघ्र कृती दल, महिला छेडछाड विरोधी पथक, गुन्हे शाखेची पथके व राज्य राखीव दलाच्या तुकड्यांचा समावेश आहे. यासोबतच सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे पोलिसांची नजर राहणार आहे. तर गुन्हे शाखेची पथके साध्या गणवेशात असणार आहेत. या सर्व बंदोबस्तावर पोलीस आयुक्त (Pune Police Commissioner) अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) व सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे हे देखरेख करणार आहेत.

    या कालावधीत नागरिकांना या सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे. या नियमानुसार यंदाचा गणेशोत्सव साजरा करावा लागेल. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, लोक बाहेर पडणार नाहीत आणि बाजारपेठेतही नागरिकांची गर्दी होणार नाही, यासाठी नागरिकांना पुणे पोलिसांकडून विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही स्वतः शिस्त पाळून पोलिसांना सहकार्य करावं, असं आवाहनही पुणे पोलिसांनी केले आहे.