‘नो एन्ट्री’मुळे नगरसेवकांचा सात्विक संताप , महापौर आणि सभागृह नेत्यांची खरडपट्टी

शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने महासभा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, याची नगरसेवकांना माहिती दिली नाही. ऑनलाइन सभेची लिंक देखील पाठविली नाही. नगरसेवक सभेसाठी सभागृहाकडे येत असताना सुरक्षारक्षकांनी नगरसेवकांना अडविले. सभागृहात जाण्यापासून मज्जाव केला. महापौरांचे तसे आदेश असल्याचे सांगितले. त्यामुळे सत्ताधारी भाजप, विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक आणि सुरक्षारक्षकांमध्ये वादावादी झाली.

    पिंपरी : लग्नाला ५० जणांना परवानगी दिली जाते. पण, महापालिका सभेला यायला नगरसेवकांना परवानगी दिली जात नाही. सभागृहात येण्यासाठी मज्जाव केला जातो. सभागृहात येणे हा आमचा घटानात्मक हक्क आहे. सभेला फक्त पदाधिकारीच का, आम्ही निवडून दिल्यानेच पदाधिकारी झाला आहात. काही चुकीची कामे करायची आहेत का, पाच वर्षासाठी सत्ता दिली आहे. त्यामुळे ‘उतू नका, मातू नका’ असा सल्ला देत नगरसेवकांनी महापौर, सभागृह नेत्यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला. महासभा ऑनलाइन घेता, मग रॅम्पवॉक का ऑनलाइन घेतला नाही. सभागृह नेत्यांनी तो कार्यक्रम का थांबवला नाही, असे खडेबोलही सदस्यांनी सुनावले.

    पिंपरी – चिंचवड महापालिकेची पेâब्रुवारी महिन्याची तहकूब सभा गुरुवारी (दि. १८) आयोजित केली होती. महापौर उषा ढोरे अध्यक्षस्थानी होत्या. शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने महासभा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, याची नगरसेवकांना माहिती दिली नाही. ऑनलाइन सभेची लिंक देखील पाठविली नाही. नगरसेवक सभेसाठी सभागृहाकडे येत असताना सुरक्षारक्षकांनी नगरसेवकांना अडविले. सभागृहात जाण्यापासून मज्जाव केला. महापौरांचे तसे आदेश असल्याचे सांगितले. त्यामुळे सत्ताधारी भाजप, विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक आणि सुरक्षारक्षकांमध्ये वादावादी झाली. नगरसेवकांनी सभागृह नेत्यांनाही जाब विचारला. या घटनेचा निषेध केला. याचे पडसाद सभेत देखील उमटले.

    स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे म्हणाल्या, सुरक्षित अंतर ठेवूनही सभागृहात ५० नगरसेवक बसू शकतात. त्यामुळे नगरसेवकांना सभागृहात येण्यास मज्जाव करणे चुकीचे आहे. सभागृहात येण्याचा आमचा हक्क आहे. जनतेने आम्हाला निवडून दिले आहे. सभागृहात कोणी बसायचे हे महापौर, सभागृह नेत्यांनी न ठरविता प्रशासनाला ठरवू द्या. राष्ट्रवादीच्या माजी महापौर मंगला कदम म्हणाल्या, लग्नाला ५० जणांना परवानगी दिली जाते. मात्र, महापालिका सभेसाठी नगरसेवकांना सभागृहात येवू दिले जात नाही. हे अत्यंत चुकीचे आहे. सभेला फक्त पदाधिकारीच का ? आम्ही निवडून दिल्यानेच पदाधिकारी झाला आहात. पाच वर्षांसाठी सत्ता दिली आहे. त्यामुळे ‘उतू नका, मातू नका’, शहरवासीय नक्कीच धडा शिकवतील. काही लपवाछपवी करायची आहे का, आम्ही सभागृहात येणारच आहोत. कोरोना आताच वाढत आहे का, महासभा ऑनलाइन घेता, मग रॅम्पवॉक का ऑनलाइन घेतला नाही. सभागृह नेत्यांनी तो कार्यक्रम का थांबवला नाही, असा सवालही कदम यांनी केला.

    माजी महापौर योगेश बहल म्हणाले, दादागिरीने सभागृह चालविले जाते. सभागृहात येण्यासाठी मज्जाव केला जात आहे. महापौर तुमच्याकडून ही अपेक्षा नाही. अनेकजण वादळात निवडून आले आहेत. त्यांच्याकडून अपेक्षा नाहीत. कोट्यावधी रुपयांची कामे आणत आहेत. कारण, त्यांना जायची पण घाई झाली आहे. भाजपचे विकास डोळस म्हणाले, आम्हाला सभागृहात येण्यापासून मज्जाव केला जात आहे. खरच आम्ही सत्ताधारी पक्षाचे आहोत का, असा आम्हाला प्रश्न पडला आहे. सभागृहात येणे आमचा हा संविधानिक हक्क आहे. नगरसेवकांना सभागृहात येवू देण्यास मज्जाव करण्याच्या घटनेचा मी निषेध करतो. सभागृह नेते नामदेव ढाके म्हणाले, दोन दिवसांपूर्वी महापौर, आयुक्त यांच्या समवेत सर्व गटनेत्यांची बैठक झाली. त्यातील चर्चेनुसार आणि पुणे, ठाणे व जळगाव या महापालिकांच्या सभांची माहिती घेऊन ऑनलाइन सभेचे नियोजन केले आहे. यात सदस्यांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता.