राज्यातील भटक्या विमुक्तांना ऍट्रोसिटी कायद्याचे संरक्षण मिळावे- नंदकुमार पवार

पारगाव : पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यात भटक्या विमुक्त जाती जमातींच्या लोकांना स्वातंत्र्याची ७३ वर्ष उलटून देखील अन्याय अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे.नुकत्याच वाशीम जिल्ह्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकी मध्ये कै. सुरेश मारुती हटकर यांनी आरोपींच्या पार्टीचे काम केले नाही म्हणून सुरेश हटकर यांचा निर्घृण पणे खून करण्यात आला आहे त्यानुसार कारंजा ग्रामीण वाशिम पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम १२० ब३०२,३२३,५०६,२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद उमेदवार दिनेश वाढेकर हे पराभूत झाले त्यामुळे त्यांनी त्यावेळेस मयत सुरेश हटकर यांनी मतदान केले नाही म्हणून मारून टाकण्याची धमकी दिली होती. तेव्हापासूनच आरोपींकडून कै.सुरेश हटकर यांचा खून करण्याचा कट रचला गेला, व त्या कटानुसार आरोपी शंकर मारोती सावंत, सुनील मारोती सावंत, ओंकार मारोती सावंत, व कार्तिक सावंत यांनी दिनेश वाढेकर यांच्या सांगण्यावरून व कट रचून ०१ ऑक्टोबर २०२०रोजी कै. सुरेश मारुती हटकर यांचा लाथा, बुक्क्या, व इतर पद्धतीने मारून जीवे मारून टाकून खून केला आहे व त्या आरोपिना अटक करून कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशा स्वरूपाचे लेखी निवेदन गोपाळ समाजहित महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हाधिकारी पुणे यांना (ता.०६) रोजी देण्यात आले आहे.

सदरील घटना अतिशय गंभीर स्वरूपाची असून त्यामुळे प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा तसेच या घटनेतील आरोपींना अटक करून आरोपींस योग्य शिक्षा होण्यास मदत करावी.तसेच आरोपी व त्यांच्या नातेवाईकांकडून पीडित कुटुंबियांच्या जीवास धोका आहे त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण मिळावे.

अन्यथा गोपाळ समाजहित महासंघ महाराष्ट्र राज्य, भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य आणि तत्सम दलित संघटनांच्या माध्यमातून महाराष्ट्र भर आंदोलन छेडले जाईल अशी माहिती यावेळी विदर्भ प्रदेशाध्यक्ष अंबादास वाणी यांनी दिली आहे.

अजूनही महाराष्ट्र राज्यात भटके विमुक्त,आदिवासी,ओबीसी बांधवांवर अन्याय अत्याचार होत आहे,त्यामुळे सरकारने या जाती जमातींना ऍट्रोसिटी कायद्याचे संरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पवार यांनी केली आहे.