आता बारामतीत पूर्ण लॉकडाऊन; जाणून घ्या काय सुरू? काय बंद?

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बारामती शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी उद्यापासून निर्बंधामध्ये वाढ करण्यात आली आहे. यामध्ये आता शनिवारी आणि रविवारी वैद्यकीय सेवा वगळता सर्व आस्थापना दुकाने बंद राहतील, असा निर्णय आज स्थानिक प्रशासनाने घेतला.

    उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आज बारामती तालुका पोलीस स्टेशन येथील बैठक सभागृहात आज बैठक झाली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, गट विकास अधिकारी राहुल काळभोर, उप विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, महेश ढवाण, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, रुई ग्रामिण रुग्णालयाचे डॉ. सुनिल दराडे, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे म्हणाले की, बारामतीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सर्वच विभागांनी जबाबदारीने काम केले पाहिजे. शहरात तसेच ग्रामीण भागात अँटीजेन टेस्टिंगची वाढ करण्यात यावी, गावात बाहेरून येणाऱ्या लोकांची यादी करून तपासणी करण्यात यावी, दुपारी 4 च्या नंतर दुकाने सुरू राहिल्यास त्यावर कडक कारवाई करावी, प्रत्येक गावात कोरोनाच्या जनजागृतीसाठी दवंडी देऊन जनजागृती करण्यात यावी.

    लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमासाठी परवानगी नसेल तर असे कार्यक्रम होऊ देऊ नये, संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी, तसेच सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमावर लक्ष द्यावे, नियम तोडणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग प्रमाण वाढवण्यात याव्यात, ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण जास्त असतील तेथे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात यावीत, सर्व संबंधित विभागांनी जबाबदारीने व समन्वय साधून काम करावे, असे आदेश त्यांनी पोलीस, वैद्यकीय व प्रशासकीय अधिकारी यांना त्यांनी दिले. तसेच नागरीकांनी नियमांचे पालन करणे, मास्क वापरणे, विनाकारण गर्दी करू नये असे आवाहनही त्यांनी केले.