आता विद्यार्थ्यांना रविवारीही द्यावी लागणार परीक्षा ; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय

विद्यापीठाची परीक्षा केवळ ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.त्यात ५० गुणांच्या प्रश्नांसाठी६० मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या बहुपर्यायी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना छायांकित प्रत किंवा पुनर्मूल्यांकन करण्याची सुविधा उपलब्ध असणार नाही.

    पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा येत्या ११ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. याबाबतची सविस्तर नियमावली विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने प्रसिद्ध केली असून त्यानुसार रविवारी सुद्धा परीक्षा घेतल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
    प्रथम वर्ष ते अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षांच्या बाबतीत आवश्यक ती सर्व माहिती विद्यार्थ्यांना एसएमएस व ई-मेल द्वारे अवगत करून दिली जाणार आहे. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांचा नोंदणीकृत ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक कार्यान्वित असणे आवश्यक आहे. ऑनलाइन परीक्षेत काही तांत्रिक कारणाने खंड पडल्यास तेवढाच कालावधी संबंधित विद्यार्थ्याला संगणकीय प्रणालीतून वाढवून दिला जाईल. तसेच यापूर्वी सोडवलेली उत्तरेही सेव्ह होऊन खंड पडल्यास तिथून परीक्षा पुन्हा सुरू होईल. परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सराव परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली जाईल. साधारणपणे ७ एप्रिलपासून विद्यार्थ्यांना सराव परीक्षा देता येईल.

    विद्यापीठाची परीक्षा केवळ ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.त्यात ५० गुणांच्या प्रश्नांसाठी६० मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या बहुपर्यायी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना छायांकित प्रत किंवा पुनर्मूल्यांकन करण्याची सुविधा उपलब्ध असणार नाही.

    ज्या महाविद्यालयांकडून ज्या विद्यार्थ्यांचे इन सेमिस्टर ,ऑनलाइन व सेशनल परीक्षांचे अंतर्गत गुण दिनांक १० एप्रिलपर्यंत विद्यापीठास प्राप्त होतील. त्याच विद्यार्थ्यांचे निकाल फक्त ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येतील. तसेच गुणपत्रके मार्च /एप्रिल २०२१ च्या परीक्षांचे निकालाबरोबरच एकत्रित वितरित करण्यात येतील, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.