भोसरी रुग्णालयातील परिचारिका अचानक संपावर; आमदार महेश लांडगे यांची यशस्वी मध्यस्थी

संपावर गेलेल्या परिचारिकांशी आमदार महेश लांडगे यांनी संवाद साधला. यांच्यासोबत झालेल्या बैठकीत परिचारिकांनी आपल्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. तसेच परिचारिकांचा पगार काढणारा लिपिक हा जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचे परिचारिकांनी सांगितले. ही बाब आमदार लांडगे यांनी अतिरिक्‍त आयुक्‍तांच्या कानावर घालून याबाबत योग्य ती कारवाई करण्यास सांगितले.

    पिंपरी: कमी आणि वेळेवर पगार मिळत असल्याने नवीन भोसरी रुग्णालयातील परिचारिकांनी मंगळवारी सकाळपासून संप पुकारला. यामुळे ९० करोना बाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र स्थानिक आमदार महेश लांडगे यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने परिचारिकांनी संप मागे घेतला व पुन्हा कामावर रूजू झाल्या आहेत. परिचारिका संपावर गेल्याचे समजताच आमदार लांडगे यांनी याची गांभिर्याने दखल घेत तातडीने बैठक घेतली.

    कमी आणि वेळेवर पगार मिळत नसल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालयातील परिचारिका मंगळवारी सकाळपासून संपावर गेल्या होत्या. यामुळे सकाळच्या पहिल्या सत्रात परिचारिका कामावर आल्या नव्हत्या. यामुळे या रुग्णालयात उपचार घेणारे ९० पुरूष आणि ३० करोनाबाधित स्त्री रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार महेश लांडगे यांनी या प्रकरणात लक्ष घातले. येथील रुग्णांच्या उपचारात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यांनी वायसीएम रुग्णालयातील पाच परिचारिकांना नवीन भोसरी रुग्णालयात आणले.

    या नंतर संपावर गेलेल्या परिचारिकांशी आमदार महेश लांडगे यांनी संवाद साधला. यांच्यासोबत झालेल्या बैठकीत परिचारिकांनी आपल्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. तसेच परिचारिकांचा पगार काढणारा लिपिक हा जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचे परिचारिकांनी सांगितले. ही बाब आमदार लांडगे यांनी अतिरिक्‍त आयुक्‍तांच्या कानावर घालून याबाबत योग्य ती कारवाई करण्यास सांगितले. तसेच यापुढील काळात वेळेवर पगार होईल, असे आश्‍वासन आमदार लांडगे यांनी परिचारिकांना दिले. यामुळे या परिचारिका दुपारनंतर कामावर रुजू झाल्या. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचा जीव भांड्यात पडला.