घरभाड्यासाठी तगादा लावल्याने गुन्हा

पुणे : स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात 'पेइंग गेस्ट' म्हणून राहात असलेल्या विद्यार्थिनीकडे घरभाडे द्यावे यासाठी तगादा लावल्याबद्दल घरमालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल

 पुणे :   स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात ‘पेइंग गेस्ट’ म्हणून राहात असलेल्या विद्यार्थिनीकडे घरभाडे द्यावे यासाठी तगादा लावल्याबद्दल घरमालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कलम १८८; तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथीचे रोग प्रतिबंधक कायद्यानुसार हा गुन्हा विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आला आहे. ‘घरभाडे द्यावे अन्यथा रूम रिकामी करावी’, अशी मागणी सातत्याने मालकाकडून होत होती.

शहरातील विविध भागांत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी अनेक जिल्ह्यांतून विद्यार्थी आलेले आहेत. त्यांच्याकडून; तसेच इतर भाडेकरूंकडून काही घरमालक घरभाडे जबरदस्तीने वसूल करीत आहेत. घरभाडे देत नसल्यास त्यांना घर रिकामी करण्याच्या धमक्या देत आहेत, अशा तक्रारी पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याकडे आल्या होत्या. त्याची शहानिशा करून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त बच्चनसिंग यांना दिल्या होत्या. घरभाड्यासाठी सतत तगादा लावत असल्याची तक्रार स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मेघा बोथरा यांनी केली. बोथरा चंद्रपूर येथून पुण्यात आलेल्या असून, नवी पेठ येथील श्रेया लीमन यांच्या घरी ‘पेइंग गेस्ट’ म्हणून आहेत. ‘घरभाडे द्यावे अन्यथा रूम खाली करावी,’ अशी मागणी घरमालक करीत असल्याचे बोथरा यांनी तक्रारीत म्हटले होते.

‘लॉकडाउन कालावधीत बिकट आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही घरमालकाने भाडेकरूकडून सक्तीने घर भाडे वसूल करू नये, किमान तीन महिने वसुली पुढे ढकलावी,’ असा आदेश आल्यानंतरही घरमालकाने घर सोडण्यास सांगितल्याने मालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.