पिंपरी चिंचवड महापालिकेत अधिकारी,कर्मचाऱ्यांना मोबाइलचा मोह सुटेना

भ्रमणध्वनीच्या वापराबाबत काही वेळा अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून शिष्टाचार पाळण्यात येत नाही. त्यामुळे राज्य शासनाची प्रतिमा मलीन होते. शासकीय कामकाज करताना भ्रमणध्वनी वापराबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २३ जुलै २०२१ रोजी सूचना दिलेल्या आहेत.

    पिंपरी: कार्यालयीन वेळेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोबाईल वापराबद्दल मागील महिन्यात राज्य शासनाने आचारसंहिता घालून दिली आहे. आजपर्यंत पिंपरी – चिंचवड महापालिका (Pimpri – Chinchwad Municipal Corporation) मुख्यालयापासून ते क्षेत्रीय कार्यालयापर्यंत एकाही कार्यालयात मोबाईल वापराच्या आचारसंहितेच्या सूचना लावण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे आचारसंहिता खुंटीला अडकवून अधिकारी आणि कर्मचारी मोबाईवरच व्यस्त राहत आहेत. याचा फटका नागरिकांना बसत असून कामासाठी येणाऱ्यांना ताटकळत उभ रहावे लागत आहे.

    मोबाईल वापरणाऱ्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने आचारसंहिता घालून दिली आहे. मोबाईलचा वापर करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून शिष्टाचार पाळला जात नसल्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने निर्देश दिले आहेत. पण ही आचारसंहिता केवळ नावालाच असल्याची दिसून येत आहे. आचारसंहिता लावल्यानंतरही महापालिका कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा हातचा मोबाईल काही सुटलेला नाही.

    अलीकडच्या काळात सुलभ आणि वेगवान संपर्क माध्यम म्हणून शासकीय कामकाजात भ्रमणध्वनीचा वापर अपरिहार्य बनला आहे. भ्रमणध्वनीच्या वापराबाबत काही वेळा अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून शिष्टाचार पाळण्यात येत नाही. त्यामुळे राज्य शासनाची प्रतिमा मलीन होते. शासकीय कामकाज करताना भ्रमणध्वनी वापराबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २३ जुलै २०२१ रोजी सूचना दिलेल्या आहेत. महत्त्वाच्या आणि स्पष्ट सूचना दिल्यानंतर या सुचना आजपर्यंत एकाही महापालिका कार्यालयात लावण्यात आलेल्या नाहीत. तसेच अनेक अधिकारी आणि कर्मचारी या आचारसंहितेचे पालन करताना दिसत नाहीत. विविध कामासाठी महापालिका कार्यालयात नागरिकांची वर्दळ राहते. मात्र, कामाच्या वेळेत अधिकारी आणि कर्मचारी मोबाईलवरच व्यस्त दिसतात.अनेक कर्मचाऱ्यांना मोबाईलची आचारसंहिता नेमकी काय ? याची जाणीव देखील नाही, हे विशेष.