
गुगल मॅप वर पत्ता शोधत शोधत चाललेल्या या व्यक्तीची गाडी थेट धरणात शिरली आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. सतीश घुले असे या व्यक्तीचे नाव आहे. सतीश घुले हे व्यावसायिक होते. सतीश हे त्यांचे मित्र गुरु आणि समीर यांच्यासोबत महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असणाऱ्या कळसुबाईवर जायला निघाले होते.
पत्ता शोधण्यासाठी आजकाल गुगल मॅपचा सर्रास उपयोग केला जातो. मात्र पूर्णतः गुगल मॅपवर अवलंबून राहणं किती धोकादायक असू शकतं, हे नुकत्याच घडलेल्या एका घटनेने सिद्ध झालंय. कॉमन सेन्स न वापरता केवळ गुगल मॅप वापरल्यामुळे प्रवास जीवावर बेतू शकतो, हे देखील आता सिद्ध झाले आहे.
अशीच एक चूक एका व्यक्तीच्या जीवावर बेतलीय. गुगल मॅप वर पत्ता शोधत शोधत चाललेल्या या व्यक्तीची गाडी थेट धरणात शिरली आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. सतीश घुले असे या व्यक्तीचे नाव आहे. सतीश घुले हे व्यावसायिक होते. सतीश हे त्यांचे मित्र गुरु आणि समीर यांच्यासोबत महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असणाऱ्या कळसुबाईवर जायला निघाले होते.
या तिघांपैकी कुणीही पूर्वी कळसुबाईवर गेलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्यातील कुणालाच या प्रवासाचा अनुभव नव्हता. शनिवारी त्यांनी एका गाडीनं कळसुबाईकडचा प्रवास सुरू केला. गुगल मॅपच्या मदतीने कळसुबाईचा पत्ता सेट केला आणि पुण्याहून प्रवास सुरू केला. गुगल मॅपच्या आधारे ते गाडी चालवत निघाले होते. गुगल मॅपनं त्यांना कोटुल ते अकोले हा सगळ्यात जवळचा रस्ता असल्याचा दाखवलं. त्यामुळे त्यांनी कुठलीही शहानिशा न करता थेट त्याच रस्त्याने गाडी घातली आणि आपला प्रवास सुरू ठेवला.
मात्र वाटेत पिंपळगाव खांड धरण होतं. त्यांची गाडी अचानक धरणात शिरली आणि बुडू लागली. तिघांनी मदतीसाठी आरडाओरडा करायला सुरुवात केली. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तिकडे धाव घेतली आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. या तिघांपैकी गुरु आणि समीर यांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आलं. तर सतीश यांचा या धरणात बुडून मृत्यू झाला.
पिंपळगाव खांड धरणावरचा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे धरणाच्या बाजूचा रस्ता हा पावसाळ्यामध्ये बंद ठेवण्यात आला होता. ही बाब तिथल्या स्थानिक लोकांना माहित होती. मात्र स्थानिकांकडे कुठलीही विचारपूस न करता थेट या पुलावरून गाडी घातल्यामुळे ती सरळ धरणात गेली आणि सतीश यांना आपल्या जिवाला मुकावे लागले.