खेडमध्ये आरोग्यसेवा रुग्णशय्येवर; चाकण उपजिल्हा रूग्णालय मान्यतेसाठी उच्च न्यायालयात याचिका

  राजगुरूनगर : खेड तालुक्यातील चाकण येथे उपजिल्हा रुग्णालय प्रस्ताव मंजूर होत नसल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती पुणे जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते निलेश कड यांनी दिली.

  यासंदर्भात अधिक माहिती देताना कड यांनी सांगितले की, खेड तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचे पितळ कोरोनाच्या आधी व कोरोना कालावधीत उघड झाले आहे. मागील ७ वर्षांपासून दोनदा शासनास चाकण उपजिल्हा रूग्णालय प्रस्ताव सादर होऊन देखील शासन ७२ कोटींच्या उपजिल्हा रूग्णालयास मान्यता देत नव्हते. मात्र, पुणे जिल्हातील आंबेगाव व बारामती येथे विशेष बाब म्हणून उपजिल्हा रूग्णालय मंजूरी नुकतीच झाली. त्यामुळे चाकण येथील श्री गजानन महाराज प्रतिष्ठानच्या सचिव मंदा शंकर कड यांनी याचिका दाखल करण्याचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

  या याचिकेत चाकण उपजिल्हा रूग्णालय व प्रलंबित चाकण औद्योगिक क्षेत्रात कामगारांसाठीचे इएसआयसी रूग्णालय तसेच  ईएसआयसी रूग्णालय, चाकण नगरपरिषद मंजूर दवाखाना, चाकण नगरपरिषद रूग्णवाहिका आणि चाकण ग्रामीण रूग्णालयात २५ लाखाचे क्ष-किरण तसेच अन्य साहित्य कोविड अनुषंगाने पुरवावे, अशी मागणी केली आहे.

  दरम्यान, चाकणच्या वैद्यकीय सेवांसाठी नागरिकांना न्यायालयात धाव घ्यावी लागत असल्याचे विदारक चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

  “चाकण नगरपरिषदेसाठी ५१ लाखांचा दवाखाना मंजूर असून देखील उभारला जात नाही. आज लसीकरणाचे बारा वाजले आहेत. त्यात उपजिल्हा व अन्य प्रस्ताव प्रलंबित ठेवणे हा जनतेशी अन्याय आहे. राजकीय पदाधिकारी म्हणून पाठपुरावा करत आहोत. मात्र, त्याला सीमा असल्याने आमचे या याचिकेला समर्थन आहे.

  – आनंद गायकवाड, शहराध्यक्ष, काँग्रेस, चाकण शहर