रविवारी सकाळी देखील धुमसत होती फटाक्याची दारू बनविणाऱ्या कारखान्यात लागलेली आग

    पिंपरी: फटाक्याची दारू बनविणाऱ्या कारखान्यात स्फोट होऊन भीषण आग लागली. ही घटना शनिवारी (दि. 24) दुपारी थेरगाव येथील पदमजी पेपर मिल समोर असणाऱ्या पी.के. मेटल या कारखान्यात घडली. शनिवारी दुपारी लागलेली आग रविवारी सकाळी देखील धुमसत होती.

    थेरगाव येथे पदमजी पेपर मिलच्या समोर दाट लोकवस्तीमध्ये पी के मेटल नावाचा कारखाना आहे. या कारखान्यात फटाक्यांची दारू बनवली जाते. आकर्षक, रंगीबेरंगी, शोभेच्या दारुकामासाठी त्यात मॅग्नेशियमचा वापर केला जातो. मॅग्नेशियम हवेत जाळले असता यातून ज्वालांसह शुभ्र झगझगीत प्रकाश बाहेर पडण्याच्या गुणधर्मामुळे याचा उपयोग शोभेच्या दारुकामासाठी केला जातो. मॅग्नेशियमला लागलेली आग पाण्याने विझत नाही. कारण त्यावर पाणी टाकले असता पाण्याबरोबर त्याची अभिक्रिया होऊन ज्वलनशील हायड्रोजन तयार होतो. नुसत्या थंड पाण्याबरोबर मॅग्नेशियमची अभिक्रिया होत नाही. मॅग्नेशियम हा चांगला उष्णता व विद्युतवाहक धातू आहे.

    पी के मेटल्स या कारखान्यातील एका मशीनमध्ये शनिवारी दुपारी बिघाड झाला आणि त्यामुळे कारखान्यात आग लागली असल्याची माहिती कारखान्याच्या मालकाने अग्निशमन विभागाला दिली. आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. कारखान्यात असलेल्या मॅग्नेशियमने पेट घेतला आणि त्याचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे थेरगाव परिसरातील काही घरांच्या छताचे पत्रे, खिडक्यांच्या काचा फुटल्या. तसेच, काही दुकानांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

    आगीची माहिती मिळताच पिंपरी मुख्य अग्निशमन दलाच्या दोन, रहाटणी उपविभाग आणि प्राधिकरण उपविभाग येथील प्रत्येकी एक असे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र मॅग्नेशियमवर पाणी टाकल्यास त्याची रासायनिक अभिक्रिया होऊन त्यातून मोठे स्फोट होऊ लागले. त्यामुळे पाणी न मारता वाळूच्या साहाय्याने आग विझवण्याचा निर्णय घेण्यात आला.आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तीन ते चार ट्रक वाळू मागवण्यात आली. जेसीबीच्या साहाय्याने आग लागलेल्या ठिकाणी वाळू टाकली असता त्यातून मिठासारखा पदार्थ उडून त्याचेही लहान लहान स्फोट होऊ लागले. कारण मागवलेल्या वाळूमध्ये काही प्रमाणात पाणी असल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले.

    शेवटी मॅग्नेशियमला पूर्णपणे जळू देण्याचा निर्णय घेण्यात आला. पिंपरी अग्निशमन विभागाचे जवान रात्रभर आग इतर परिसरात पसरू नये यासाठी प्रयत्न करीत होते. रविवारी दुपारी तीन वाजेपर्यंत मॅग्नेशियम पूर्णपणे जळून जाईल त्यानंतर पुढील कुलिंगची कार्यवाही केली जाणार असल्याचे लिडिंग फायरमन काटे यांनी सांगितले. यापूर्वी जुलै 2013 मध्ये देखील या ठिकाणी अशीच आग लागली होती. सुदैवाने त्यावेळी आणि आताही दोन्ही घटनांमध्ये जीवित हानी झाली नाही. फटाक्यांची दारू बनवण्याचा पी. के. मेटल हा कारखाना दाट लोकवस्तीत आहे. या ठिकाणी आग लागण्याचा कायम धोका असतो. त्यामुळे हा कारखाना बंद करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.