शिवसेनेच्या माजी शाखा प्रमुखाच्या हत्या प्रकरणी एकास अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० मार्च रोजी सकाळी स्थानिक नागरिकांना सुर्वे यांचा मृतदेह दिसला. मात्र मृतदेह पालथा असल्याने नागरिकांनी त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले. कोणीतरी दारू पिऊन पडला असावा असा नागरिकांचा अंदाज होता. मात्र मृतदेहाजवळ रक्त सांडले असल्याने नागरिकांना संशय आला. याबाबत स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली

    पिंपरी: शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख विजय सर्जेराव सुर्वे (वय ४०) यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे. १० मार्च रोजी मुळशी खुर्द येथे मानगाव ते पुणे या रस्त्यावर सुर्वे यांचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी हर्षल अशोककुमार राठोड (वय २९, रा. निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. राठोड याच्यासह महमद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या बाबत अशोक नामदेव कांबळे (वय २८, रा. मुळशी खुर्द, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. सुरुवातीला या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा गुन्हा पिंपरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० मार्च रोजी सकाळी स्थानिक नागरिकांना सुर्वे यांचा मृतदेह दिसला. मात्र मृतदेह पालथा असल्याने नागरिकांनी त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले. कोणीतरी दारू पिऊन पडला असावा असा नागरिकांचा अंदाज होता. मात्र मृतदेहाजवळ रक्त सांडले असल्याने नागरिकांना संशय आला. याबाबत स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. आरोपींनी सुर्वे यांच्या तोंडावर, मानेवर व डोक्यात टणक बोथट हत्याराने मारून त्यांचा खून केला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी सुर्वे यांचा मृतदेह पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुळशी खुर्द गावाजवळ टाकला होता. पोलिसांनी आरोपी निष्पन्न करून त्यातील एकाला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.