नाष्ट्यासाठी हॉटेलात थांबला अन् एक लाखाचे नुकसान करून बसला

    पिंपरी : शोरूममधील रोकड दुचाकीच्या डिकीत ठेवून बँकेत भरण्यासाठी जात असताना नाष्ट्यासाठी हॉटेलात थांबले असता चोरट्यांनी दुचाकीची डिक्की उचकटून एक लाखाची रोकड लांबवली. हा प्रकार खेड तालुक्यातील कुरूळी येथील त्रिमूर्ती हॉटेलजवळ घडला.

    कृष्णा नरसिंग देशमुख (वय २९, रा. खराबवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी देशमुख कुरूळी फाटा येथील महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह वेहिकल्स या शोरूममध्ये काम करतात. ३ जून रोजी सकाळी फिर्यादी देशमुख तळेगाव चौकातील एचडीएफसी बँकेत रोकड भरण्यासाठी जात होते.

    कुरूळी येथील त्रिमूर्ती हॉटेलसमोर त्यांनी सकाळी साडेनऊ वाजता त्यांची दुचाकी पार्क केली. अर्धा तासात ते हॉटेलमधून नाश्ता करून बाहेर आले. त्यावेळी दुचाकीची डिक्की उचकटून चोरट्यांनी एक लाखाची रोकड चोरून नेल्याचे उघडकीस आले. या घटनेचा पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.