महापालिका निवडणुकीसाठी एक सदस्यीय वॉर्ड पद्धती, वॉर्डरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश

पिंपरी - चिंचवड महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. बहुसदस्यीय प्रभाग (पॅनेल) पद्धतीऐवजी एक सदस्यीय प्रभाग (सिंगल वॉर्ड) पद्धतीने निवडणूक होणार आहे. त्यानुसार, प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. २७ तारखेपासून आराखडा तयार करण्याचे काम सुरु होणार आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार आकडेवारी वापरण्यात येणार आहे. साधारणत: १४ ते १५ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग असेल. प्रभाग रचना करताना सर्वप्रथम उत्तर दिशेकडून सुरूवात केली जाणार आहे.

  पिंपरी – चिंचवड महापालिकेसह राज्यातील अठरा महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार आहेत. मुंबई महापालिकेसह १७ महापालिकांच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारने एकसदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली आहे. महापालिकेची निवडणुक अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपली असल्याने राज्य निवडणुक आयोगानेही आता निवडणुक पुर्वतयारीस सुरूवात केली आहे. राज्य निवडणूक उपायुक्त अविनाश सणस यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

  निवडणुक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार, प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. प्रभाग रचनेचे प्रमुख तीन टप्पे राहणार आहेत. त्यामध्ये आरक्षणासह प्रारूप प्रभाग रचना करणे, हरकती व सुचनांवरील सुनावणी घेणे आणि अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करणे या प्रक्रीयांचा समावेश आहे. या निवडणुकांसाठी सन २०११ च्या जनगणनेनुसार आकडेवारी वापरण्यात येणार आहे. प्रभाग रचना करताना गुगल मॅप वापरून त्यावर प्रगणक गट दर्शविण्यात येणार आहेत. महापालिकेची एकूण लोकसंख्या भागिले महापालिकेची एकूण सदस्य संख्या या सूत्रानुसार प्रभागाची सरासरी लोकसंख्या निश्चित केली जाणार आहे.

  प्रभाग रचना करताना सर्वप्रथम उत्तर दिशेकडून सुरूवात केली जाणार आहे. उत्तरेकडून ईशान्य, त्यानंतर पूर्व दिशेकडे येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभाग रचना करत शेवट दक्षिणेकडे करण्यात येणार आहे. प्रभागांना क्रमांकही त्याच पद्धतीने दिले जाणार आहेत. प्रभागरचना करताना भौगोलिक सलगता राहील याची काळजी घेतली जाणार आहे. नागरिकांच्या सामाईक हितासाठी प्रभागातील वस्त्यांचे शक्यतोवर विभाजन होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती यांच्या वस्त्यांचे शक्यतो विभाजन होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे. नागरिकांचे प्रभागामधील दळणवळण विचारात घेतले जाणार आहे. प्रभागाच्या सीमारेषा या रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, मोठे रस्ते, उड्डाणपुल अशा नैसर्गिक मर्यादा घेऊन निश्चित केली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत एका इमारतीचे, चाळीचे, घराचे विभाजन दोन प्रभागात होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. प्रभागरचना करताना प्रगणक गट शक्यतो फोडला जाणार नाही. नकाशामध्ये जनगणनेचे वॉर्ड अणि प्रगणक गट स्पष्ट दाखवून त्यांचे क्रमांकही स्पष्ट दर्शविण्यात येणार आहेत. महापालिका स्तरावर प्रभागरचना अंतिम करण्याबाबतचे अधिकार राज्य निवडणुक आयुक्तांनी संबंधित महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

  सन २०११ ची जनगणना विचारात घेऊन मतदारसंख्या निश्चित केली जाणार आहे. मतदारयाद्या अद्ययावत करण्याबाबत सूचविण्यात आले आहे. प्रभाग प्रारुप रचनेचे काम २७ ऑगस्टपासून हाती घेण्यात यावे तसेच ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावेत. अंतिम प्रभाग रचना, आरक्षण आणि सोडतीचा कार्यक्रम यथावकाश निवडणूक आयोगाकडून जाहीर केला जाईल, असेही या आदेशात म्हटले आहे

  १) एवूâण लोकसंख्या : १७ लाख २७ हजार ६९२

  २) अनुसूचित जातीची लोकसंख्या : २ लाख ७३ हजार ८१० (१५.८४ टक्के)

  ३) अनुसूचित जमातीची लोकसंख्या : ३६ हजार ५३५ (२.११ टक्के)

  ४) एकसदस्यीय प्रभाग संख्या : १२८

  ५) नगरसेवक संख्या : १२८

  ६) अनुसूचित जातींसाठी राखीव जागा : २०

  ७) अनुसूचित जमातीसाठी राखीव जागा : ०३

  १) २०१७ ची एकूण मतदारसंख्या : ११ लाख ९२ हजार ८९

  २) २०१७ ची पुरुष मतदारसंख्या : ६ लाख ४० हजार ६९६

  ३) २०१७ ची महिला मतदारसंख्या : ५ लाख ५१ हजार ३६२

  कच्चा आराखडा गोपनीय ठेवणार

  वॉर्डाचा कच्चा आराखडा तयार करण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जाणार आहे. या समितीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्राची संपुर्ण माहिती असणारा अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, नगररचनाकार, संगणकतज्ज्ञ, तसेच आवश्यकतेनुसार इतर अधिकाऱ्यांची वर्णी लागणार आहे. या समितीने राजकीय दबावाला बळी पडून कच्चा आराखडा तयार करु नये. राज्य निवडणूक आयोग काटेकारेपणे पडताळणी करेल. प्रसंगी योग्य ते बदल सुचवेल, आरक्षण सोडतीच्या दिनांकापर्यंत कच्चा आराखड्याविषयी गोपनीयता बाळगावी, समितीव्यतिरिक्त कोणालाही आराखड्याची माहिती देऊ नये, असे राज्य निवडणूक आयोगाने बजावले आहे.