पोत्यात गांजा भरून विक्रीसाठी निघाला होता ‘तो’, पोलिसांना मिळाली माहिती अन्…

पोत्यात गांजा भरून तो मोपेड दुचाकीवरून विक्री करण्यास निघालेल्या एका तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली.

    पुणे : पोत्यात गांजा भरून तो मोपेड दुचाकीवरून विक्री करण्यास निघालेल्या एका तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. लोणीकंद परिसरात त्याला पकडले आहे. त्याच्याकडून 2 लाख 62 हजार रुपयांचा 13 किलो गांजा जप्त केला आहे. नितीन मोहन डुकळे (वय 25, वाघोली) याला अटक केली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

    शहरात अमली पदार्थ तस्करी करणारे जाळे मोठे असून, गांजा तसेच इतर अमली पदार्थ मोठया प्रमाणात पुरवला जात असल्याचे दिसत आहे. अमली पदार्थ विरोधी पथक या गुन्हेगारांवर लक्ष ठेवून कारवाई करत आहे. तरीही छुप्या पद्धतीने हे सुरू आहे. अमली पदार्थ विरोधी पथक एकचे कर्मचारी व अधिकारी वाघोलीत गस्त घालत होते. त्यावेळी गायरानवस्ती येथील कचरा डेपोसमोर दुचाकी घेऊन एकजण जात असल्याचे दिसले. पोलिसांना संशय आल्याने त्याला थांबवले व तपासणी केली. दुचाकीच्या समोर पोत्यात गांजा मिळून आला. त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

    ही कारवाई पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, मनोज साळुंखे, राहुल जोशी, मारुती पारधी, विशाल दळवी, विशाल शिंदे, रेहाना शेख, नितेश जाधव, योगेश मोहित त्यांच्या पथकाने केली आहे.