‘म्हाडा’साठी ऑनलाइन अर्जनोंदणी सुरू; विक्रीसाठी ऑनलाइन सोडत जानेवारीत काढणार

पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या कार्यक्षेत्रातील पुण्यासह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पाच हजार ६४७ सदनिका विक्रीसाठी ऑनलाइन सोडत जानेवारीत (Online application for MHADA ) काढणार आहे. त्यासाठी अर्जनोंदणीचा प्रारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १०) दुपारी अडीच वाजता मुंबईत होणार आहे. १० डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून ११ जानेवारी रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळांवर सदनिकांसाठी ऑनलाइन अर्जनोंदणी करता येणार आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमास गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवासन आणि ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी दिली.

‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यात म्हाळुंगे येथे एक हजार ८८०, दिवे येथे १४ तर सासवड येथे चार सदनिका आहेत. सोलापूर जिल्ह्यात ८२ सदनिका आहेत. २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत पुणे महापालिका क्षेत्रात ४१०, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात एक हजार २० आणि कोल्हापूर महापालिका येथे ६८ सदनिका आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेतून पुणे जिल्ह्यात म्हाळुंगे (चाकण) येथे ५१४, तळेगाव दाभाडे येथे २९६, सोलापूर जिल्ह्यात गट क्रमांक २३८/१, २३९ करमाळा येथे ७७ आणि सांगली येथे सर्व्हे क्रमांक २१५/३ येथे ७४ सदनिकांसाठी अर्ज भरता येतील. पुणे जिल्ह्यातील मोरवाडी पिंपरी येथे ८७, पिंपरी वाघेरे येथे ९९२ सदनिका आहेत. सांगली येथे १२९ सदनिका आहेत.