घर बसल्या करा लसीकरणसाठी ‘ऑनलाइन’ नोंदणी ; हे आहे संकेतस्थळ

लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची आरोग्य केंद्रांवर गर्दी होत आहे. तरी नागरिकांनी आरोग्य केंद्रात गर्दी करू नये. महापालिकेने कळविल्यानंतरच नागरिकांनी केंद्रावर जावे- आयुक्त राजेश पाटील

    पिंपरी:  कोरोना प्रतिबंधित लस १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना मोफत टोचण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी www.cowin.gov.in या संकेतस्थळावरून नोंदणी करता येणार आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागणार आहे. मोबाईलवर आलेला ओटीपी, आधार क्रमांक नोंदवावा लागणार आहे.

    ‘जेंडर’ सिलेक्ट केल्यानंतर जन्मसाल टाकावे लागणार आहे. पिन कोड टाकल्यानंतर तुम्हाला लसीकरणाची तारीख येईल. तर पहिला मेसेज रेफरन्स ‘आयडी’ लसीकरण केंद्रावर दाखवायचा आहे. तर दुसरा मेसेज कोणत्या तारखेला लसीकरणासाठी जायचे, याची माहिती देईल. शहरात कोरोना प्रतिबंधित लसींचा तुटवडा असून महापालिकेने वेंâद्र शासनाकडे तीन लाख लसींची मागणी केली आहे. लस उपलब्ध होताच या विषयीची माहिती महापालिका नागरिकांना कळवणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.

    शहर परिसरामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून लसीकरणाची मोहीम अधिक गतिमान केली जाईल. त्या पद्धतीने महापालिकेमार्फत शहर आणि परिसरातील केंद्रांवर लसीकरण होणे अपेक्षित आहे. पण, लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची आरोग्य केंद्रांवर गर्दी होत आहे. तरी नागरिकांनी आरोग्य केंद्रात गर्दी करू नये. महापालिकेने कळविल्यानंतरच नागरिकांनी केंद्रावर जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

    शहरात लसीकरणासाठी गर्दी वाढू लागली आहे. ४५ वर्षांवरील व्यक्ती लसीकरण केंद्रांवर हेलपाटे मारू लागले आहेत. मात्र, सध्या पुरेशा प्रमाणात लस मिळत नसल्याने शहरातील बहुतेक केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. ग्रामीण भागातही अशीच परिस्थिती आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लस टोचून घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे लसीची मागणी वाढली असतानाही पुरेशा प्रमाणात लस मिळत नाही. महापालिका आयुक्तांनी सर्वांनीच लस टोचून घेण्यापूर्वी स्वत: नोंदणी करावी, अन्यथा लस मिळणार नाही, असा फतवा काढला. आता नोंदणी करूनही लस मिळत नाही. या पार्श्वभूमीवर आता सोमवार (दि.३) पासून काय परिस्थिती राहणार, याचा विचार करायला नको, असे अधिकारी सांगू लागले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने लस मिळावी म्हणून पाठपुरावा सुरू केला आहे.