प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

काही दिवसांपूर्वी पिंपरी - चिंचवडमधील तीन शाळांच्या क्लासमध्ये कोणीतरी अनोळखी व्यक्ती सहभागी झाली होती. या व्यक्तीने क्लास सुरू असताना पॉर्न व्हिडीओ सुरू केला. त्यामुळे शिक्षकांना क्लास बंद करावा लागला. त्यानंतर, शाळेने संबंधित व्यक्तीविरोधात सायबर सेलकडे तक्रार केली आहे.

    पिंपरी: कोरोना प्रादूर्भावामुळे शाळा बंद असल्याने सर्व शाळा ऑनलाईन(online School) पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत ऑनलाईन क्लास सुरु असताना अचानकपणे अश्लील पॉर्न व्हिडीओ (Porn videos) सुरु होण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. पिंपरी – चिंचवड शहरातही काही शाळांच्या ऑनलाईन क्लास दरम्यान अश्लील व्हिडीओ सुरू झाल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे शाळांसमोर ऑनलाईन सुरक्षिततेचे आव्हाण निर्माण झाले आहे.

    कोरोना प्रादूर्भावामुळे गेल्या दीड वर्षापासून देशातील सर्वच शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय स्विकारला. खासगी, सरकारी सर्वच शाळांमध्ये आता ऑनलाईन पद्धतीने क्लास घेतले जातात. त्यासाठी काही शाळांनी स्वतःचे अ‍ॅप तयार केले आहेत. तर, बहूतांश शाळा गुगल मीट, झूम या अ‍ॅपद्वारेच ऑनलाईन क्लास घेतात. मात्र, या मोफतच्या अ‍ॅपद्वारे ऑनलाईन क्लास घेणाऱ्या शाळांना काही वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले आहे.

    या अ‍ॅपद्वारे क्लास घेण्यासाठी शाळेकडून विद्यार्थ्यांना एक लिंक पाठविण्यात येते. त्या लिंकद्वारे या अ‍ॅपवर क्लासमध्ये सहभागी होता येते. मात्र, ही लिंक व्हाट्सअ‍ॅप,फेसबुकद्वारेही दिली जात असल्याने तसेच या अ‍ॅपला कोणतीही सुरक्षा नसल्याने यामध्ये कोणीही सहभागी होऊ शकतो. काही दिवसांपूर्वी पिंपरी – चिंचवडमधील तीन शाळांच्या क्लासमध्ये कोणीतरी अनोळखी व्यक्ती सहभागी झाली होती. या व्यक्तीने क्लास सुरू असताना पॉर्न व्हिडीओ सुरू केला. त्यामुळे शिक्षकांना क्लास बंद करावा लागला. त्यानंतर, शाळेने संबंधित व्यक्तीविरोधात सायबर सेलकडे तक्रार केली आहे. शाळांनी तक्रार केली असली तरी हे प्रकार वारंवार होऊ लागल्याने शाळांपूढे विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन सुरक्षिततेचे आव्हान निर्माण झाले आहेत.

    सायबर सेलने दिली नियमावली

    १) शाळेने फ्री अ‍ॅप वापरू नये
    २) शाळेने स्वतःचे अ‍ॅप, वेबसाईट वापरावी
    ३) प्रत्येक क्लाससाठी एसेस कन्ट्रोल पॉलिसी असावी
    ४) ऑनलाईन क्लासमध्ये इतर शिक्षक, पालक, अनोळखी व्यक्ती येणार नाही, यासाठी धोरण ठरवावे
    ५) ऑनलाईन क्लाससाठी सायबर सिक्यूरिटी ट्रेनरची नेमणूक करावी
    ६) क्लासमध्ये हजर, गैरहजर, उशिरा येणाऱ्यांची नोंद ठेवावी
    ७) क्लाससाठी होस्ट, अ‍ॅडमिन, प्रेझेंटर, टेक्निशियन यांची नेमणूक करावी
    ८) प्रत्येक विद्यार्थी ऑनलाईन क्लासमध्ये सुरक्षित आहे का, याची खातरजमा करावी

    ''गेल्या दीड वर्षापासून ऑनलाईन क्लास सुरु आहेत. सर्व वर्ग ऑनलाईन पद्धतीने भरत आहेत. तरी देखील अनेक शाळांनी स्वतःचे अ‍ॅप डेव्हलप केले नाही. मोफतच्या अ‍ॅपद्वारे ऑनलाईन क्लास घेतले जातात. मोफतच्या अ‍ॅपला कोणत्याही प्रकारच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना केलेल्या नसतात. त्यामुळेच क्लास सुरु असताना अश्लील व्हिडीओ सुरु होणे, वेगळे चित्र दिसणे, आवाज येणे असे प्रकार घडतात. हे प्रकार टाळण्यासाठी सायबर सेलने शाळांना एक नियमावली दिली आहे. त्याचे पालन केल्यास विद्याथ्र्यांची ऑनलाईन सुरक्षा करणे शक्य होणार आहे.''

    डॉ. संजय़ तुंगार (वरिष्ठ पोलिस निरीक्षक - सायबर सेल)