फी न मिळाल्याने पुणे येथील खासगी शाळांच्या ऑनलाईन घंटा वाजणार नाही

 

पुणे: खाजगी शाळांना पालकांकडून मिळणारे सहकार्य आणि खाजगी शाळांची दयनीय अवस्थेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील खाजगी शाळा १५ ते १७ डिसेंबर या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत. शाळांची ऑनलाइन घंटा देखील वाजणार नाही. या आंदोलनात पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील एक हजार ४८३ पेक्षा अधिक शाळा बंद राहतील. या बंदचा उद्देश शुल्कवसुली नाही. असे प्रायव्हेट इंग्लिश मिडियम स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र सिंग यांनी स्पष्ट केले.

असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र सिंग म्हणाले, “कोविड परिस्थितीमुळे अचानक शाळा बंद झाल्या. असे असले तरी अध्ययन, अध्यापन कार्यात खंड पडू नये याकरिता खाजगी शाळांच्या शिक्षक आणि शाळा एडूप्रेन्युअर्स यांनी शिक्षणाची दरी कमी करण्यासाठी स्वत: ला ऑनलाईन प्रशिक्षण सत्रामध्ये सुसज्ज केले. त्यातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या पालकांनी संपर्क साधला, आम्ही त्यांना मदत केली आहे. परंतु असे बरेच पालक आहेत ज्यांनी कोणत्याही कारणास्तव शाळांशी संपर्क साधला नाही आणि फी देखील दिली नाही.

कोरोना काळातील या सहा ते सात महिन्यांत एक बाब निदर्शनास आले आहे की, काही पालक शाळांकडून केले जाणारे कॉल देखील टाळत आहेत. फी देखील भरत नाहीत. खाजगी शाळांनी या सहा महिन्यांत मोठ्या प्रमाणावर पालक आणि विद्यार्थ्यांना सहकार्य केले आहे. केवळ ३०-४० टक्के पालक फी भरत असल्याने व शाळेचा सर्व खर्च फीवर अवलंबून असल्याने हा सर्व शालेय कारभार सुरळीत चालण्यासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ मिळत नाही. खाजगी शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास सक्षम असल्या तरीही फी न मिळाल्याने असमर्थ आहेत. याचा परिणाम शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या जीवनावर होत आहे.

महाराष्ट्र राज्यातील शाळांची आपली असमर्थता व दयनीय परिस्थिती दर्शविण्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळांचे ऑनलाईन वर्ग तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील एक हजार ४८३पेक्षा अधिक शाळा बंद राहतील. या बंदचा उद्देश शुल्कवसुली नाही. आम्ही ईमेल द्वारे राज्य सरकारला देखील मार्ग काढण्याची विनंती केली आहे. यावर तोडगा निघाला नाही तर जानेवारी महिन्यात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असेही सिंग यांनी सांगितले.