ऑटो क्लस्टर येथे वायसीएमएचमधून संदर्भित रूग्णांनाच भरती करावे; महापालिका आयुक्त राजेश पाटिल यांचा महत्वपूर्ण आदेश

‘स्पर्श‘ने पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील, इतर भागातील कोरोना बाधित रुग्णांना ऑटो क्लस्टर येथे थेट दाखल करून घेऊ नये. वायसीएमएचमधून संदर्भित केलेल्या रूग्णांनाच भरती करावे, असा महत्वपूर्ण आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.

    पिंपरी:आईसीयू बेडसाठी एक लाख रुपये घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमधील महापालिकेचे कोविड हॉस्पिटल संचलन करणाऱ्या फॉर्च्युन स्पर्श हेल्थ केअर या खासगी संस्थेला महापालिका आयुक्तांनी दणका दिला आहे. ‘स्पर्श‘ने पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील, इतर भागातील कोरोना बाधित रुग्णांना ऑटो क्लस्टर येथे थेट दाखल करून घेऊ नये. वायसीएमएचमधून संदर्भित केलेल्या रूग्णांनाच भरती करावे, असा महत्वपूर्ण आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे. याबाबत ‘स्पर्श‘ हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाला लेखी पत्र देवून कळविण्यात आले आहे.

    चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये महापालिकेचे कोविड हॉस्पिटल सुरू असून फॉर्च्युन स्पर्श हेल्थ केअर ही खासगी संस्था त्याचे संचलन करते. या हॉस्पिटलचा सर्व खर्च महापालिका करत आहे. मोफत उपचार होत असलेल्या या हॉस्पिटलमध्ये महापालिका शाळेच्या मुख्याध्यापिकेला आयसीयू बेड देण्यासाठी खासगी हॉस्पिटलच्या मदतीने ‘स्पर्श’च्या सल्लागाराने एक लाख रुपये घेतल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी स्पर्शचे डॉ. प्रवीण जाधव, वाल्हेकरवाडी येथील पद्मजा हॉस्पिटलचे डॉ. शशांक राळे आणि डॉ. सचिन कसबे यांना अटक करण्यात आली आहे.

    स्पर्शकडून काम काढून घेण्याचा आदेश महापौरांनी महापालिका प्रशासनला दिला होता. त्यापार्श्वभूमीवर आयुक्त राजेश पाटील यांनी ‘स्पर्श’चा थेट रुग्ण दाखल करून घेण्याचा अधिकार काढला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता. अत्यावश्यक बाब म्हणून स्पर्शला ऑटो क्लस्टरमधील महापालिकेच्या कोविड हॉस्पिटल संचलनाचे कामकाज दिले होते. स्पर्श संस्थेमार्फत कोरोनाच्या रुग्णांना दाखल करुन घेतले जात होते. परंतु, नगरसेवक, नागरिकांकडून कोरोना बाधित रुग्णांना दाखल करताना तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. महापालिका सभेत याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याअनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील, इतर भागातील कोरोना बाधित रुग्णांना ऑटो क्लस्टर येथे थेट दाखल करून घेऊ नये.

    वायसीएममधून संदर्भित केलेल्या रूग्णांनाच भरती करुन घ्यावे. वायसीएमएचचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे यांनी तोंडी कळविल्यानुसार डॉ. हर्षल पांडवे, प्राध्यापक पी.एस.एम यांनी वायसीएम रुग्णालयातील ऑटो क्लस्टर येथे रुग्ण संदर्भित करण्यात यावेत. याबाबत त्यांनी डॉ. राहुल गायकवाड, डॉ. गौरव वडगावकर यांच्याशी समन्वय साधून ऑटो क्लस्टर येथील उपलब्ध बेडची माहिती घेऊन रुग्ण पाठवावेत. उपलब्ध बेडची खातरजमा झाल्यावरच रुग्णाला संदर्भित करण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आयुक्तांनी आदेशात स्पष्ट केले आहे.