…तरच बारामतीत निर्बंध होणार शिथिल : अजित पवार

    बारामती : बारामती शहरासह ग्रामीण भागात अजूनही हव्या त्या प्रमाणात रूग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे हलगर्जीपणा करून चालणार नाही. कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करत शर्थीचे प्रयत्न करा, निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. रुग्णसंख्या पाच टक्क्यांच्या आत आल्याशिवाय निर्बंध शिथिल करता येणार नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.

    बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -१९ विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा अजित पवार यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, पंचायत समिती उपसभापती रोहित कोकरे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, उपवनसंरक्षक पुणे विभाग राहूल पाटील, अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता विश्वास ओव्हाळ, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. धोडपकर, डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, डॉ. चंद्रकांत मस्के, डॉ. सुनिल दराडे, संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

    अजित पवार म्हणाले की, सध्या बारामती शहर व ग्रामीण भागातील रूग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत आहे. मात्र, हे प्रमाण समाधानकारक नाही. अजून काही प्रमाणात म्हणजेच रूग्णसंख्या कमी आल्याशिवाय बारामती तालुक्यातील निर्बंध शिथिल करता येणार नाहीत. जर गर्दी वाढत राहिली तर दिवसाआड एका बाजूची दुकाने चालू ठेवण्याची परवानगी देण्यात येईल. जर रूग्णसंख्या ५ टक्क्यांच्या आत आली तर आपल्याला पूर्णपणे निर्बंध शिथील करता येतील. शासन व स्थानिक प्रशासन कोरोना प्रार्दुभाव कमी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे.

    तसेच नागरिकांनीही शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे. लसीकरणाचे योग्य नियोजन करावे. म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी इंजेक्सशनचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. कोविडशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधन सामुग्री तसेच औषधे, ऑक्सिजनचे योग्य प्रकारे नियोजन करण्याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी असेही ते म्हणाले.