शिक्रापुरात प्रतिबंधित क्षेत्रातून नागरिकांचा खुलेआम वावर

प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली शिक्रापूर : शिक्रापूर (ता.शिरूर) येथील औरासिटी सोसायटीमध्ये महिनाभरात एकूण चार कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर खबरदारी म्हणून प्रांताधिकारी यांनी औरासिटी

प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

शिक्रापूर : शिक्रापूर (ता.शिरूर) येथील औरासिटी सोसायटीमध्ये महिनाभरात एकूण चार कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर खबरदारी म्हणून प्रांताधिकारी यांनी औरासिटी सोसायटी प्रतिबंधित क्षेत्र तसेच परिसरातील पाच किलोमीटरचा परिसर बफर क्षेत्र म्हणून जाहीर केलेला आहे. या सोसायटीमधून नागरिकांचा खुलेआम वावर होत असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील औरासिटी सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका महिलेला महिनाभरापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यांनतर या आठवड्यामध्ये मुंबईहून आलेल्या एका इसमाला कोरोनाची लागण झालेली असताना सदर इसम राहत असलेल्या घरातील चौघांचे कोरोना अहवाल तपासणीसाठी पाठविले असताना त्यापैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह तर दोघांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यामुळे एकाच आठवड्यात एकाच घरातील तिघांना कोरोनाची लागण झाल्याची घटना घडली आणि त्यामुळे शिक्रापूर सह परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती. शिरूर उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी शिक्रापूर औरासिटी सोसायटी प्रतिबंधित क्षेत्र तसेच परिसरातील पाच किलोमीटरचा परिसर बफर क्षेत्र म्हणून तीन जून २०२० पासून पुढील चौदा दिवसांपर्यंत घोषित केले आणि त्याबाबत आदेश देखील काढला आहे. काढण्यात आलेल्या आदेशामध्ये सदर सोसायटीमध्ये फिरणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची हालचाल रोखणे गरजेचे असल्याचे देखील सांगितले आहे.

– नागरिक मास्क न वापरता बाहेर फिरतात

नागरिकांनी मास्क वापरणे बंधनकारक असताना देखील या ठिकाणी अनेक नागरिक मास्क न वापरता फिरत आहेत. औरासिटी सोसायटीमध्ये एकाच वेळी तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर देखील नागरिक खुलेआम फिरत असून सदर सोसायटी सुद्धा पूर्णपणे खुली आहे आणि त्या ठिकाणचे सर्व गेट देखील उघडे आहेत. या सोसायटी परिसरामध्ये कसल्याही प्रकारची खबरदारी घेतली जात नाही तर येथे लावण्यात आलेले सर्व फलक देखील जमीनदोस्त झालेले आहे. नागरिकांचा राजरोसपणे वावर होत असल्याने अनेकांना मोठ्या अडचणींना जाण्याची वेळ येऊ शकते. चारशेहून अधिक सदनिका असलेली सोसायटी असताना त्याठिकाणी सुरक्षारक्षक नसल्यामुळे सर्वच सुरक्षा ऐरणीवर आलेली आहे.

– याबाबत ग्रामपंचायत ला कळविले जाईल – अविनाश जाधव

शिक्रापूर येथील औरासिटी सोसायटी प्रतिबंधित क्षेत्र असताना देखील पूर्णपणे खुले असल्याबाबत शिक्रापूरचे तलाठी अविनाश जाधव यांच्याशी संपर्क साधला ती सोसायटी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये असून त्याचे पालन होत नसल्याबाबत शिक्रापूर ग्रामपंचायतला याबाबत कळवून कार्यवाही करण्यास सांगितले जाईल असे तलाठी अविनाश जाधव यांनी सांगितले.

– सोसायटी चालकांना नोटीस काढून सूचना देऊ – ग्रामविकास अधिकारी गोरे

शिक्रापूर येथील औरासिटी सोसायटी प्रतिबंधित क्षेत्र असताना देखील पूर्णपणे खुले असल्याबाबत शिक्रापूर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी बि. बि. गोरे यांच्याशी संपर्क साधला असता औरासिटी सोसायटीची ग्रामपंचायतकडे नोंद नसून कोणत्याही प्रकारचा कर ग्रामपंचायतला भेटत नाही तरी देखील त्या ठिकाणी फवारणी केलेली आहे आणि आता त्या सोसायटी चालकांना याबाबत सूचना करून सोसायटी बंद करण्याच्या सूचना देण्यात येतील असे ग्रामविकास अधिकारी बि. बि. गोरे यांनी सांगितले.