विरोधी पक्षनेते विठ्ठल काटे कोरोना पॉझिटिव्ह

आमदार, महापौरांसह कार्यक्रमास लावली होती हजेरी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आज (गुरूवार) दुपारी समोर आले आहे.

दरम्यान, भाजपा आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारूढ पक्षाचे नेते नामदेव ढाके यांनी आज सकाळी जगताप डेअरी येथील ग्रेड सेपरेटरच्या उदघाटनाप्रसंगी एकत्र हजेरी लावली होती. त्यावेळी विरोधी पक्ष नेते काटे हे देखील उपस्थित होते.  त्यामुळे  आता आमदार, महापौर, सत्तारूढ पक्षांचे नेते यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावर देखील क्वारंटाइन होण्याची वेळ येते की काय हे पहावे लागणार आहे.
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा आज दुपारी करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्यांच्यावर पुण्यातील नामांकित रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी त्यांनी करोना टेस्ट केली होती. त्याचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला. त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. काटे यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे.

दरम्यान, आज सकाळीच पिंपळे सौदागर येथील ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विरोधी पक्षनेते काटे हे महापौर यांच्या शेजारीच उभा होते. तसेच, भाजपा आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके, नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्यासह अनेक जणांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यामुळे आमदार आणि महापौर यांच्यासह इतर काही जणांना क्वारंटाइन व्हावं लागणार असल्याचे दिसत आहे