भाजपच्या राड्यानंतर हेल्मेट घालून सभागृहात पोहोचले विरोधी पक्षाचे सदस्य

सभेच्या वेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने हेल्मेट घालून सभेत एंट्री करून मागील घटनेचा वेगळ्या पद्धतीने निषेध केला.

पिंपरी:मागील आठवड्यामध्ये पिंपरी चिंचवड़ महापालिकेच्या स्थायी समिती सभेत भाजपच्या सदस्यांनी राडा घातला. यात सभागृहात तोड़फोड़ आणि अधिकाऱ्यांना धक्काबुक़्क़ी करण्यात आली. त्यानंतर अनेकांनी या राड्याचे तर्क वितर्क लावले. मागील तहकूब झालेली स्थायीची बैठक बुधवारी (दि.१६) घेण्यात आली. यावेळी सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी हेल्मेट घालून एंट्री केली.

मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकांनी आयुक्तांना खुलासा विचारत सभेत मोठा गोंधळ घातला. भाजपच्याच सदस्यांनी सभापतींच्या कारभारावरून आक्षेप घेत हा राडा केला. जगताप समर्थक सदस्यांनी सभागृहात मोडतोड़ केली, सभापति आणि आयुक्तांवर धावून गेले तसेच नगरसचिवांना धक्काबुक्की केली. त्यानंतर ही सभा तहकूब करण्यात आली. आज सभेच्या वेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने हेल्मेट घालून सभेत एंट्री करून मागील घटनेचा वेगळ्या पद्धतीने निषेध केला.

आज स्थायी समितिच्या सभेत शिवसेना सदस्य राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे सदस्य सुलक्षणा शीलवंत धर, पंकज भालेकर, पौर्णिमा सोनवणे हे हेल्मेट परिधान करून आले. गेल्या आठवड्यातील बैठकीत सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी घातलेल्या राड्यामुळे विरोधी पक्षातील सदस्यांनी अशी एंन्ट्री करून सर्वांचेच लक्ष वेधले आहे.त्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. या स्टंटबाजीवरून महापालिकेत कुजबूज सुरु झाली.