Amazon वरून स्पाय कॅमेरा मागवत महिला डॉक्टरच्या बेडरूम आणि वॉशरुमध्ये बसवला; MD डॉक्टर अटकेत

भारती विद्यापीठ कॅम्पसमधील स्टाफ क्वार्टरमध्ये राहणाऱ्या एका महिला डॉक्टरच्या बेडरुम आणि बाथरुममध्ये कॅमेरे लावल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वी उघडकीस आली

    पुणे: भारती विद्यापीठातील कॅम्पसमध्ये राहणाऱ्या ३१ वर्षीय डॉक्टर महिलेच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे आढळतयाची धक्कदायक घटना नुकतीच समोर आली आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय सुजित जगताप नावाच्या डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे.एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

    अमेझॉनवरून मागवला कॅमेरा
    प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या रूममध्ये कॅमेरे बसवण्यासाठी आरोपी सुजितने अमेझॉनच्या शॉपिंग साईटवरून छुपा कॅमेरा असणारा बल्ब मागवला असल्याचे तपासात सिद्ध झालेले आहे. आरोपी सुजित हा प्रसिद्ध एमडी डॉक्टर आहे. अटक केलेल्या आरोपी डॉक्टरला न्यायालयाने दोन दिवसाची ह पोलीस कोठाडी सुनावली आहे.

    अशी घडली घटना
    भारती विद्यापीठ कॅम्पसमधील स्टाफ क्वार्टरमध्ये राहणाऱ्या एका महिला डॉक्टरच्या बेडरुम आणि बाथरुममध्ये कॅमेरे लावल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. पीडिता सकाळी ८:४५ वाजता नेहमीप्रमाणे कामावर गेली होती. सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास रुममध्ये परत आल्यावर तिला बाथरूम आणि बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावले असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पीडित महिलेने ६ जुलै २०२१ रोजी तक्रार नोंदवली होती.

    आरोपीवर कठोर कारवाई करून त्याला जामीन मिळू नये, याची दक्षता घेण्यात यावी. अशा अपप्रवृत्तीच्या व्यक्तींना कठोर शिक्षा झाल्यास समाजात या गुन्ह्याची पुनरावृत्ती होणार नाही, त्याला निश्चितच आळा बसेल. महिलांनीही सजग राहून सावधानता बाळगावी.

    डॉ. नीलम गोऱ्हे

    विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलीस आयुक्तांना आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे निर्देश दिले होते. अशाच प्रकारचे किती गुन्हे आरोपीने केले आहेत, याची माहिती मिळावी, याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना नीलम गोऱ्हे यांनी निवेदन सादर केले. पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी करावी म्हणजे असे अनेक गुन्हे समोर येऊन समाजातील सर्व महिलांना तसेच फिर्यादी महिला डॉक्टरांना न्याय मिळेल, असेही मत डॉ नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले होते.