बंदी असूनही मावळमध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन; २१ जणांवर गुन्हा दाखल

कोरोना नियमांचे उल्लंघन करत शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. बैलांना यातना होईल, अशा प्रकारे क्रूरतेने व निर्दयपणे वागवून बैलगाडा चढणीच्या रस्त्याने घाटात पळवण्यात आला

    पिंपरी: महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीवर बंदी असताना शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी मावळमधील २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश दत्तात्रय म्हस्के, हनुमंत शिवाजी म्हस्के, विक्रम बाळासाहेब केडे, आदिनाथ बाळू गराडे, आदिनाथ बाळू म्हस्के, मनोज अंकुश ढोरे यांच्यासह २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी आशिष काळे यांनी फिर्याद दिली आहे.

    मावळ तालुक्यातील शिवणे येथे बैलगाडा घाटात ११ जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमारास बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. देश कोरोना संकटातून जात असताना आणि बैलगाडा शर्यतीवर बंदी असूनही बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वडगाव-मावळ पोलिसात गाडा मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करत शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. बैलांना यातना होईल, अशा प्रकारे क्रूरतेने व निर्दयपणे वागवून बैलगाडा चढणीच्या रस्त्याने घाटात पळवण्यात आला. वडगाव-मावळ पोलीस तपास करत आहेत.