अदर पूनावाला लंडनहून भारतात परतले; मिळणार Y श्रेणीची सुरक्षा

अदर पूनावाला भारतात परतले आहेत. पुण्यामध्ये खासगी विमानाने अदर पूनावाला दाखल झाले. जवळपास गेल्या महिन्याभरापासून जास्त काळ परदेशात असणाऱ्या अदर पूनावाला यांनी सतत धमक्या मिळत असल्याचा आरोप केल्याने खळबळ माजली होती. यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचं जाहीर करण्यात आलं होतं.

  पुणे : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला भारतात परतले आहेत. पुण्यामध्ये खासगी विमानाने अदर पूनावाला दाखल झाले. जवळपास गेल्या महिन्याभरापासून जास्त काळ परदेशात असणाऱ्या अदर पूनावाला यांनी सतत धमक्या मिळत असल्याचा आरोप केल्याने खळबळ माजली होती. यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचं जाहीर करण्यात आलं होतं.

  दरम्यान आता ते पुण्यात परतले असून हे प्रकरण पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भारतात एकीकडे मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु असताना दुसरीकडे सिरमच्या कोव्हिशिल्ड लसीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. देशात करोना लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने गोंधळाचं वातावरण असताना यादरम्यानच मे महिन्यात अदर पूनावाला लंडनला निघून गेले होते. अदर पूनावाला यांनी आपण उद्योगाच्या निमित्ताने लंडनला जात असून तेथील काम संपल्यानंतर परतणार असल्याचं सांगितलं होतं. सिरम लंडनमध्येही आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. सिरम फक्त भारतच नाही तर जगभरातील सर्वात मोठ्या लसनिर्मिती कंपन्यांमध्ये गणली जाते. सिरम कोव्हिशिल्ड लसीचं उत्पादन करत असून आतापर्यंत सर्वाधिक वापर झालेल्या लसींमध्ये तिचा समावेश आहे. ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान सिरम केंद्र सरकारला जवळपास ५० कोटी लसींचे डोस पुरवणार आहे.

  ट्विट करुन दिली माहिती…

  अदर पूनावाला यांनी नुकतंच ट्विट करत ब्रिटनमध्ये भागीदार आणि भागधारकांसोबत चांगली बैठक झाल्याचं सांगितलं होतं. तसंच पुण्यात कोव्हिशिल्डचं उत्पाहन वेगाने सुरु असल्याची माहिती दिली होती. काही दिवसांत मी परतणार असून यावेळी कामाची पाहणी करण्यास उत्सुक आहे असंही ते म्हणाले होते.

  दरम्यान सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी आपल्याला मुख्यमंत्री ते उद्योजक अशा अनेकांकडून धमक्या मिळत असल्याचा खुलासा केल्याने देशात सध्या खळबळ माजली होती. अदर पुनावाला यांनी ‘द टाईम्स’ या युनायटेड किंग्डममधील वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. “कोविशिल्ड लशीसाठी आपल्याला देशातील काही बड्या व्यक्तींचे फोन येत आहेत. यामध्ये काही राज्यांचे मुख्यमंत्री व उद्योगपतींचाही समावेश आहे,” असं पूनावाला यांनी म्हटलं होतं. “मागील काही दिवसांमध्ये काही प्रभावी व्यक्तींचे मला फोन येऊन गेले. ज्यामध्ये काही राज्यांचे मुख्यमंत्री व उद्योगपतींचा समावेश आहे, त्यांच्याकडून वारंवार फोन येत आहेत. आम्हालाच लस लवकर हवी आहे, असं म्हणत त्यांच्याकडून दबाव आणला जात आहे,” असा खुलासा पुनावाला यांनी केला होता.

  तसेचं ”याला धमक्या म्हणणं फार साधी गोष्ट ठरेल. या लोकांना असणाऱ्या अपेक्षा आणि त्यांच्याकडून वापरली जाणारी भाषा खरोखर खूपच विचित्र आहे. खरं तर हा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. प्रत्येकाला आपल्याला लस मिळावी असं वाटतं आहे. मात्र आपल्याआधी इतरांना लस का दिली जातेय हे त्यांना समजत नसल्याचे अडचण निर्माण होतेय.” असं पुनावाला म्हणाले होते.

  पूनावालांना वाय दर्जाची सुरक्षा

  अदर पूनावाला यांना केंद्र सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येणार आहे. गृह मंत्रालयाकडून या संदर्भात एक आदेश जारी करण्यात आला होता. यामध्ये अदर पूनावाला यांना सीआरपीएफ संरक्षण देण्याची सूचना करण्यात आली होती. पुण्यातील मांजरीमधील १०० एकर परिसरात अदर पूनावाला यांची सिरम कंपनी आहे.