शहरातील ८० टक्के बधितांची कोरोनावर मात

८७ हजार ३१७ कोरोनाबाधितांपैकी ७० हजार २६९ रुग्ण बरे
पुणे :  शहरात कोरोना बधितांची संख्या वाढत असली तरी, मागील आठवड्या पासुन शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने बरे होत आहेत.  शहरातील ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात  केली आहे. शहरातील ८७ हजार ३१७ कोरोनाबाधितांपैकी ७० हजार २६९ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ८०.४८ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. सध्याशहरात अॅक्टीव रुग्णांचे प्रमाण १७.११ टक्के आहे. रुग्णसंख्येचा दुपटीचा कालावधी आता ४० दिवसांवर आला आहे.

शहरात जूनपासून लॉकडाऊन शिथिलतेनंतर बाधितांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे प्रशासनाने १४ जुलैपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. या वेळी शहरातील बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा ५७, सक्रिय बाधितांची संख्या ३९, तर मृत्यूदरही ४ टक्‍के होता. त्यानंतर पुढील दहा दिवस शहरात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. याचे परिणाम आता दिसत असून, मागील पंधरा दिवसांपासून नवीन बाधितांचा आकडा घटण्यास सुरुवात झाली आहे. त्याचवेळी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.

शहरात आतापर्यंत ४ लाख २० हजार ४५८ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. हे प्रमाणही देश आणि राज्यातील चाचण्यांच्या प्रमाणापेक्षा खूप जास्त आहे. दर दहा लाख लोकसंख्येमागे ९४ हजार ९३५ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. झालेल्या चाचण्यांपैकी पॉझिटीव्ह रिपोर्ट आलेल्या चाचण्यांचे प्रमाण २०.७७  टक्के आहे.

शहरात एकूण ८७ हजार ३१७  जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यापैकी तब्बल ७० हजार २६९ रुग्ण बरे झाले आहेत. बुधवारपर्यंत २ हजार १०८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरातील कोरोना मृत्यूंचे प्रमाण २.४१टक्के आहे. शहरात सध्या १४हजार ९४० सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण आता १७.११ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. सक्रिय रुग्णांपैकी ७ हजार ९४६ रुग्ण घरीच राहून म्हणजेच होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत तर उर्वरित ६ हजार ९९४ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

शहरात ८१२ कोरोना रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे. हे प्रमाण ५.४४ टक्के आहे. सध्या ४९२ कोरोना रुग्णांना व्हेंटीलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले असून ३२० रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शहरातील कोरोना रुग्ण दुपटीकरणाचा वेग ४०.११ दिवस इतका आहे. चाचण्यांची संख्या वाढल्यामुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८० टक्क्यांहून अधिक आहे. तसेच मृत्यूदरही २.४१ टक्क्यांपर्यंत मर्यादित आहे.