प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अक्षय बावस्कर ‘नायपर जेईई’मध्ये दिव्यांग प्रवर्गात पहिला

१४ वर्षांचा असताना त्याला तीव्र ऑस्टियोमाइलाइटिस हा आजार झाला. त्यानंतर उपचारासाठी तो पुण्यात दाखल झाला. उपचार पद्धती खूप दिवसांची असल्याने त्याने त्याचे शिक्षणसुद्धा पुण्यातच सुरू केले, उपचार सुरू असताना त्याच्या पायावर चार शस्त्रक्रिया करण्यात आल्या.त्यावर मात करत अक्षयने यश मिळवले आहे.

    पिंपरी: आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचा विद्यार्थी अक्षय बावस्कर याने औषधनिर्माण शास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या नायपर जेईई – २०२१ परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे. त्याने दिव्यांग प्रवर्गातून देशभरातून प्रथम क्रमांक मिळवला आहे.

    ही प्रवेश परीक्षा नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, हैदराबाद या स्वायत्त दर्जा असलेल्या संस्थेतर्फे घेतली जाते. अक्षय हा मूळचा संभाजीनगर जिल्ह्यातील घाणेगावचा रहिवासी आहे. सध्या तो परिवारसोबतच आकुर्डीत वास्तव्याला आहे. चारजणांचे कुटुंब असून वडील मजूर आहेत तर आई गृहिणी आहे. मोठी बहीण मुंबईला रिलायन्स हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करते. तो १४ वर्षांचा असताना त्याला तीव्र ऑस्टियोमाइलाइटिस हा आजार झाला. त्यानंतर उपचारासाठी तो पुण्यात दाखल झाला. उपचार पद्धती खूप दिवसांची असल्याने त्याने त्याचे शिक्षणसुद्धा पुण्यातच सुरू केले, उपचार सुरू असताना त्याच्या पायावर चार शस्त्रक्रिया करण्यात आल्या.त्यावर मात करत अक्षयने यश मिळवले आहे.