पुण्यात ऑक्सफर्डची लस घेणाऱ्या ‘त्या’ दोघांची प्रकृती उत्तम; काहीही साइड इफेक्ट नाहीत

ऑक्सफर्ड विद्यापीठाने कोरोना व्हायरस विरोधात विकसित केलेल्या लसीची देशातील पहिली मानवी चाचणी काल पुण्यात करण्यातआली.

पुणे : ऑक्सफर्ड विद्यापीठाने (oxford university) कोरोना व्हायरस (corona virus) विरोधात विकसित केलेल्या लसीची (vaccine) देशातील पहिली मानवी चाचणी (human testing) काल पुण्यात करण्यातआली. पुण्याच्या भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये (bharti university medical college) कालपासून ऑक्सफर्डने कोरोना व्हायरस विरोधात विकसित केलेल्या लसीच्या मानवी चाचण्या सुरु झाल्या आहेत. काल दोन स्वयंसेवकांना या लसीचा ०.५ एमएलचा पहिला डोस देण्यात आला.

प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत डॉक्टरांनी पात्र ठरलेल्या दोन स्वयंसेवकांना करोना लसीचा डोस दिला. आधी आवश्यक वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर हा डोस देण्यात आला. ऑक्सफर्ड लसीच्या फेज २ (phase 2) चाचणी अंतर्गत हे डोस देण्यात आले. ऑक्सफर्डच्या करोना लशीची मानवी चाचणी करण्यासाठी पुढे आलेल्या दोन स्वयंसेवकांची तब्येत ही ठरवण्यात आलेल्या निकषांप्रमाणे चांगली असल्याची माहिती माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

पुणे स्थित सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाने (serum institute of india) बनवलेल्या ‘कोविशिल्ड’ (covishield) लसीचा ३२ आणि ४८ वर्ष वय असलेल्या दोन स्वयंसेवकांना पहिला डोस दिला. भारतात ऑक्सफर्डच्या लसीचे नाव ‘कोविशिल्ड’ आहे. दोन्ही स्वयंसेवकांना एक महिन्यानंतर या लसीचा पुन्हा दुसरा डोस दिला जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

“कालपासून आमची वैद्यकीय टीम दोन्ही स्वयंसेवकांच्या संपर्कात आहे. दोघांचीही प्रकृती चांगली आहे. त्यांना कुठेही दुखत नाहीय किंवा ताप नाहीय” असे मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे वैद्यकीय उपसंचालक डॉ. जितेंद्र ओस्वाल यांनी सांगितले. बुधवारी लस दिल्यानंतर दोन्ही स्वयंसेवकांचे अर्धा तास परीक्षण करण्यात आले. त्यानंतर त्यांना घरी जाऊ दिले असे डॉक्टरांनी सांगितले. पीटीआयने हे वृत्त दिले आहे. काही गरज पडल्यास त्यांनी इमर्जन्सीमध्ये नंबर देण्यात आले आहेत तसेच आमचे वैद्यकीयपथकही त्यांच्या संपर्कात आहे असे डॉ. जितेंद्र ओस्वाल म्हणाले. काल पाच जणांवर लस चाचणी करण्यात येणार होती. पण तिघांच्या शरीरात अँटीबॉडीज आढळून आल्या. त्यामुळे ते लस चाचणीसाठी अनफिट ठरले.