होय ! आता हवेतून होणार ऑक्सिजन निर्मिती

  अकलुज : स्किड माऊंटेड पध्दतीने हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा राज्याच्या सहकारातील पहिला पथदर्शी प्रकल्प येथील श्री पांडुरंग कारखान्याने उभारला आहे. सुपंत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प असे त्याचे नामकरण करण्यात आले असून, कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले.

  प्रतिदिन २५ एमक्युब उत्पादन क्षमता

  यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, दिनकरराव मोरे, दाजी पाटील, दिनकर नाईकनवरे, प्रणव परिचारक, रोहन परिचारक, ऋषिकेश परिचारक, यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य, अधिकारी, शेतकरी, कामगार उपस्थित होते. यावेळी प्रकल्प उभारणीसाठी योगदान देणाऱ्या अनिल मोरे (नाशिक), अमित गॅस एजन्सीचे सचिन साखळकर यांचा आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रतिदिन २५ एमक्युब एवढी या प्रकल्पाची उत्पादन क्षमता आहे. त्यासाठी साधारणतः ५५ काेटी ६० लाख रूपये खर्च आला असून, त्यात ४० ते ४५ लाख रूपयांची मशिनरी आहे.

  परकीय तंत्रज्ञान असलेला पहिलाच प्रकल्प

  आमदार परिचारक म्हणाले, राज्यात सहकारी क्षेत्रात अशा पध्दतीने उभारलेला व संपूर्ण परकीय तंत्रज्ञान असलेला हा पहिलाच प्रकल्प आहे. नािशक येथील साई कन्वेन्शनच्या माध्यमातून उभारलेल्या या प्रकल्पाचे सर्व तंत्रज्ञान तैवान येथून आयात केले आहे. प्रतिदिन २५ एमक्युब एवढी त्याची उत्पादन क्षमता आहे. गेल्या पंधरवड्यातच हा प्रकल्प कार्यान्वित झाला असता मात्र, वादळामुळे अडचण आली. त्यानंतर विमानाने ही मशिनरी आणून केवळ आठ तासात त्याची उभारणी केली आहे. येथून निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या गुणवत्तेची चाचणी झाली असून हा ऑक्सिजन दवाखान्यात वापरण्यासाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे.

  संकटात मदतीचा हात देण्याची कारखान्यांनी घेतली जबाबदारी

  गेल्या काही दिवसात राज्यात सतराशे ते साडे सतराशे टन ऑक्सिजनची गरज होती. तेवढी निर्मिती आपल्याकडे होत नव्हती. या परिस्थितीत ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या नेत्यांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचे आवाहन केले होते. वास्तविक राज्याच्या जडणघडणीत साखर कारखान्यांचे मोठे योगदान राहिले आहे. संकटाच्या काळात मदतीचा हात देण्याची जबाबदारी कारखान्यांनी नेहमीच घेतली आहे. सहकारी उद्योगातील स्किट माऊंटींगचा हा पहिलाचा प्रकल्प पांडुरंगने कार्यान्वित केला आहे, असे आमदार प्रशांत परिचारक यांनी म्हटले आहे.

  पांडुरंग कारखान्याकडून सामाजिक कार्य

  पांडुरंग कारखाना खऱ्या अर्थाने आजवर सामाजिक कार्य करीत आला आहे. दुष्काळात चारा छावण्या, टँकरने पाणीपुरवठा, अतिवृष्टीच्या काळात अडचणीत आलेल्यांना अन्नधान्याचा पुरवठा अशा माध्यमातून सतत मदत करीत आला आहे. शेतकरी सुखाय, कामगार हिताय ही भूमिका घेऊन सुधाकरपंत परिचारक यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. सुंपत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प हा त्याचीच साक्ष देत आहे, असे पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले.