ओझरची चांदीची छत्री आरोपींच्या घरात !

एकच महीन्यात तपास लागल्याने गणेश भक्तांमधुन समाधान
ओतूर : अष्टविनायक तिर्थ क्षेत्रातील एक असलेल्या व असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील ओझरच्या श्री विघ्नहर गणपती मंदिरात दीड किलो वजनाची सोन्याचा मुलामा दिलेली चांदीची छत्री आणि दानपेटीमधील रक्कम २७ जुलैला चोरीस गेली होती. यामुळे संपूर्ण तालुक्यात तसेच गणेश भक्तांमधे खळबळ उडाली होती. पोलीस प्रशासन तपासला सरसावले मात्र काही केल्या या चोरीचा धागा दोरा लागेनात पोलिसांनी श्वान पथक, हस्त रेषा तज्ञ यांना देखील पाचारण केले होते. श्री ओझर गणपती मंदिरातील सी. सी. टी.व्ही.मध्ये या चोरीचा प्रकार कैद झाला होता. यामध्ये दोघे जण चोरी करताना दिसत होते. मात्र हे दोघे कोण? हा सवाल सर्वत्र भेडसावणारा असातानाच याचा पोलिसांना तपास लावायचा हे एक आव्हान होते. मात्र हा तपास लागला आणि संपूर्ण गणेश भक्तांच्या आनंदाला पारावार उरला नाही यामुळे गणेश भक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे.

– सी.सी.टी.व्ही.मध्ये चोरीचा प्रकार कैद
याबाबत अधिक माहिती देताना ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी सांगितले की आळेफाटा पोलिसांकडून संदीप सखाराम पतवे व विठ्ठल महादू पतवे रा.कळस खुर्द (ता.अकोले) या दोघांना ताब्यात घेवून कसून चौकशी करुन तपास केला असता त्यांनी ओझर येथील गणपती मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. भा.द.वि.कलम ४५७,३८०,३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. तसेच आरोपींकडून मंदिरात चोरी करण्यासाठी मदत केलेल्या लक्ष्मण विठ्ठल पतवे, अविनाश पांडुरंग सावंत रा.कळस(ता.अकोले) या दोघांची नावे सांगितलेली आहेत. तसेच पंधराशे रुपयाची रोकड आणि मंदिरातील चांदीची छत्री चेपवलेल्या अवस्थेत सदर आरोपींच्या राहत्या घरी लपवलेले निष्पन्न झाले हा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.ही कामगिरी उपविभागिय पोलीस अधिकारी दिपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक परशुराम कांबळे, पोलीस नाईक विकास गोसावी, पोपट मोहरे, हेड कॉंस्टेबल पंकज पारखे, देविदास खेडकर, नवनाथ कोकाटे यांनी केली असुन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. याबाबत अधिक तपास ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक परशुराम कांबळे करित आहेत.

– लवकरच उर्वरीत आरोपी पोलिसांच्या जाळ्यात असणार
ओझर श्री विघ्नहर गणपती मंदिरातील चोरीचा गणेशोत्सव काळातच तपास लावला असल्याने
गणेश भक्तांमधे आनंदाचे वातावरण आहे. वेळोवेळी अनेक घटनांमध्ये पोलीस विभाग टिकेचे वाटेकरी असतात मात्र कोरोणा प्रादुर्भाव काळात पोलिसांनी ताणतणावात देखील भाविकांच्या भावना जाणुन जलद गतीने तपास लावल्याने पोलिसांवरील टिकेचे संकट विघ्नहर कृपेनेच टळले अशी चर्चा सर्वसामाण्यांमधून होत आहे.लवकरच उर्वरीत आरोपी पोलिसांच्या जाळ्यात असणार आहेत.
दिपाली खन्ना, उपविभागिय पोलिस अधिकारी