स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या पीए आणि दोन क्लार्कना लाच घेताना अटक

    पुणे : पिंपरी-चिंचवड पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या पीए आणि दोन क्लार्कना पुण्याच्या एसीबीने २ लाख रुपयांची लाचप्रकरणात पकडले आहे. त्यामुळे पिंपरी-चिचवड, पुणे शहर व जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. ऍड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे यांचा पीए ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे, क्लार्क अरविंद कांबळे व राजेंद्र शिंदे अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांना पालिकेचे टेंडर मिळाले आहे. त्याची वर्क ऑर्डर काढण्यासाठी त्यांनी ६ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी केली. पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, आज सायंकाळी तडजोडीअंती २ लाख रुपयांची लाच घेताना पीए ज्ञानेश्वर पिंगळे व क्लार्क कांबळे व शिंदे यांना पकडण्यात आले आहे. तर, लांडगे हे तेथूबन पसार झाले आहेत. या कारवाईने मात्र राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.